

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने पुरुष टी-२० टीम ऑफ द इयर २०२४ ची घोषणा आज (दि.२५) केली आहे. त्यात रोहित शर्मा याला टीमचा कॅप्टन बनविण्यात आले आहे. तर टीममध्ये रोहित शर्मा याच्यासह जसप्रीम बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग या चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्डकप जिंकला होता.
रोहितने जूनमध्ये भारताला आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर तो वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
आयसीसीच्या या संघात भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळाली आहे. भारताने वेस्ट इंडिजमध्ये २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला आणि टीम इंडियाच्या या विजयात हार्दिक पंड्या, बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या संघात रोहित शर्मा, ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल साल्ट (इंग्लंड), बाबर आझम (पाकिस्तान), निकोलस पूरन ( विकेट कीपर, वेस्ट इंडिज), हार्दिक पंड्या (भारत), सिकंदर रझा (झिम्बाबे) , वानिन्दू हसरंगा (श्रीलंका), रशीद खान (अफगानिस्तान) , अर्शदीप सिंग (भारत), जसप्रीत बुमराह (भारत) यांचा समावेश आहे.