

लंडन: संघात स्थान नाही, कर्णधारपद नाही... पण संघावरील प्रेम आणि निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही. भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडमधील ओव्हलवरील कसोटी पाहण्यासाठी एका सामान्य चाहत्याप्रमाणे हजेरी लावून सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याचा हा साधेपणा पाहून सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून केवळ एक खेळाडू म्हणून संघात स्थान देण्याची तयारी निवड समितीने दर्शवली होती. मात्र, ही गोष्ट रोहितला रुचली नाही आणि त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याची चर्चा होती. गेले कितेक दिवस तो कुठेच दिसला नव्हता. पण अचानक तो इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारताचा सामना सुरु असताना रोहित शर्मा अचानक दाखल झाला आणि त्याने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले.
एखादा मोठा खेळाडू संघातून बाहेर झाल्यावर नाराजी व्यक्त करू शकतो, पण रोहितने कमालीचा मोठेपणा दाखवला. तो एका सामान्य चाहत्याप्रमाणे, साधा टी-शर्ट, जीन्स, गॉगल आणि टोपी अशा वेशात ओव्हल स्टेडियमवर पोहोचला. त्याचा हा साधेपणा इतका होता की, सुरुवातीला तो रोहित शर्मा आहे हे अनेकांच्या लक्षातही आले नाही. त्याने प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. स्टेडियममध्येही तो अशा ठिकाणी बसला, जिथे कॅमेऱ्याची नजर सहजासहजी पोहोचणार नाही. त्याने संघातील खेळाडू किंवा स्टाफच्या कामकाजात कोणताही व्यत्यय आणला नाही आणि शांतपणे सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहचला.
'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँड खेळाडूचा हा साधेपणा चाहत्यांना प्रचंड भावला. वैयक्तिक मतभेदांपेक्षा संघाचे हित मोठे मानणाऱ्या रोहितने आपल्या या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो केवळ मैदानावरचाच नाही, तर मैदानाबाहेरचाही 'कॅप्टन' आहे.