

सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी, ही भारतीय स्टार जोडी 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकेल की नाही, हे ठरवेल, असा दावा माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने केला आहे. मार्च महिन्यानंतर आपला पहिलाच व्यावसायिक सामना खेळणार्या विराट व रोहित यांना पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर तग धरता आला नाही. भारतीय संघाला या सामन्यात 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर पाँटिंग बोलत होता.
‘आयसीसी रिव्ह्यू’ कार्यक्रमात भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत बोलताना पाँटिंग म्हणाला, दोन्ही दिग्गज खेळाडूंनी केवळ 2027 च्या विश्वचषकाचा विचार करण्याऐवजी अल्पकालीन ध्येये निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही मोठ्या विश्रांतीनंतर परतता, तेव्हा साहजिकच तुमच्या खेळात पूर्वीची लय नसते. कोणत्याही परदेशी संघासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर दोन दिवसांतच पर्थसारख्या मैदानावर खेळणे आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे नसते, विशेषतः जेव्हा खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी असते आणि समोर दर्जेदार वेगवान गोलंदाज असतात; पण मला वाटते की केवळ वेळच हे ठरवेल, असे रवी शास्त्री याप्रसंगी म्हणाले.