

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटमध्ये ‘टीम फर्स्ट’ संस्कृती आणण्यासाठी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या वन डे कर्णधारपदावरून रोहित शर्माला दूर करून, या जोडीने 2027 विश्वचषकासाठी दीर्घकालीन योजना आखल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीसीसीआयच्या एका माजी पदाधिकार्याने या निर्णयाला ‘जीए एजी’चा (गंभीर-आगरकर) आदेश असे समर्पक नाव दिले आहे.
विराट कोहलीचा फिटनेस निर्विवाद आहे आणि रोहितच्या तुलनेत त्याचे भवितव्य इतके अंधःकारमय नाही, तरीही दोघे एकाच नावेत आहेत. आगरकर यांच्या निवड समितीला वाटते की, कोहलीकडे 2027 पर्यंत टिकून राहण्याची शक्यता अजूनही आहे.
आगरकर यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट उत्तरे दिली. रोहितने हा निर्णय चांगल्या प्रकारे स्वीकारला नाही, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. तो माझ्या आणि रोहित किंवा आमच्या (निवडकर्त्यांच्या) आणि रोहितमधील संवाद आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे तो (निर्णय) निश्चितपणे कळविण्यात आला आहे. हा निर्णय किती कठीण होता, यावर आगरकर म्हणाले, तुम्हाला कधीकधी भविष्यात काय अपेक्षित आहे, संघ म्हणून तुम्ही कुठे उभे आहात आणि शेवटी संघाच्या हितासाठी सर्वोत्तम काय आहे, याकडे पाहावे लागते. मग ते आता असो वा सहा महिन्यांनंतर, हे निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. केवळ एका फॉरमॅटमध्ये खेळणार्या खेळाडूंच्या फॉर्मबद्दल आगरकर यांनी शंका व्यक्त केली. ते दोन अनुभवी खेळाडू आहेत, जे बर्याच काळापासून संघात आहेत. त्यामुळे सर्वात कमी खेळल्या जाणार्या एकाच फॉरमॅटमध्ये खेळणे त्यांना थोडे अडचणीचे वाटू शकते, असे ते म्हणाले.
रोहित आणि विराटकडून काय अपेक्षा आहेत, यावर आगरकर म्हणाले, वन डे संघात कायम राहण्यासाठी धावा करणे हेच त्यांच्यासाठी एकमेव लक्ष्य आहे. रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय करिअर अंतिम टप्प्यावर पोहोचत असले तरी, तो स्वतःच्या अटींवर निवृत्त होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
गंभीर आणि आगरकर यांनी भारतीय क्रिकेटमधील एका प्रभावशाली व्यक्तीच्या आशीर्वादाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तीन प्रमुख पैलू आहेत :
2027 विश्वचषकाची योजना : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही 2027 च्या विश्वचषकाच्या योजनांमध्ये फारसे स्थान नाही, यावर गंभीर आणि आगरकर दोघेही सहमत आहेत.
एका फॉरमॅटवर शंका : रोहित-कोहली ही जोडी केवळ एका आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये (वन डे) आणि वर्षातून दोन महिने आयपीएल खेळून आपला फॉर्म (आणि रोहितच्या बाबतीत फिटनेस) टिकवू शकणार नाही, असे या जोडीला वाटते.
सर्व फॉरमॅटमध्ये युवा कर्णधार : पुढील दशकासाठी एक मजबूत आदर्श तयार करण्याची संधी बीसीसीआयला मिळत आहे. त्यामुळेच, भारतात होणार्या आगामी टी-20 विश्वचषकानंतर शुभमन गिल हा सूर्यकुमार यादवकडून टी-20 संघाचेही कर्णधारपद स्वीकारण्याची शक्यता आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये तो नेतृत्व करेल.
या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम असा आहे की, रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर समाप्तीच्या जवळ आहे.