Rohan Bopanna announces retirement
नवी दिल्ली: भारतीय टेनिसमध्ये दोन दशकांहून अधिक काळ अमूल्य योगदान देणारा, दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांचा विजेता रोहन बोपण्णा याने शनिवारी (दि. १) निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले.
बोपण्णाने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "ज्या गोष्टीने माझ्या जीवनाला अर्थ दिला, तिला निरोप कसा देणार? २० अविस्मरणीय वर्षांच्या प्रवासानंतर आता मी अधिकृतपणे माझा रॅकेट खाली ठेवत आहे. सर्व्हिस अधिक मजबूत करण्यासाठी लाकूड तोडण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांत उभे राहण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान ठरला," असेही त्याने नमूद केले आहे.
रोहन बोपण्णा हा भारतातील स्टार टेनिसपटूपैकी एक आहे. भेदक सर्व्हिस आणि उत्कृष्ट नेट प्लेच्या माध्यमातून त्याने दुहेरी (Doubles) आणि मिश्र दुहेरी (Mixed Doubles) प्रकारात आपला ठसा उमटविला होता. २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अनेक डेव्हिस कप स्पर्धा आणि ऑलिम्पिक खेळांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षी २०२४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी (मॅथ्यू एब्डनसोबत) जिंकले. अवघ्या काही दिवसांतच ४३ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. यूएस ओपनच्या अंतिम फेरीशिवाय, बोपण्णाने इतर तीन ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेऱ्या गाठल्या यामध्ये पुरुष दुहेरीमध्ये (२०२३ यूएस ओपन, एब्डनसोबत) आणि दोन मिश्र दुहेरीमध्ये (२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन, टायमिया बाबोससोबत आणि २०२३ ऑस्ट्रेलियन ओपन, सानिया मिर्झासोबत) याचा समावेश आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये वर्षाअखेरीस होणाऱ्या एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यातही त्याने धडक माली होती.