पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) खेळणार आहे. २३ जानेवारीपासून खेळल्या जाणार्या दिल्लीच्या सामन्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे त्याने स्पष्ट केले असल्याचे वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.
ऋषभ पंत आणि विराट कोहली हे रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) च्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर काही तासांमध्ये २३ जानेवारीपासून राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी पंतने केली आहे, अशी माहिती 'डीडीसीए'चे सचिव अशोक शर्मा यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये काही अपवादात्मक खेळी वगळता ऋषभ पंतची कामगिरी सुमारच राहिले. त्याचा त्याला फटका बसला आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या टी२० संघातून वगळण्यात आले आहे.
यापूर्वी शुभमन गिल याने रणजी ट्रॉफीत कर्नाटकविरुद्ध पंजाबच्या सामन्यात खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. तसेच सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही मुंबईच्या पुढील सामन्यात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी मुंबईत रणजी संघासोबत सरावही सुरू केला आहे.
ऋषभ पंत हा सप्टेंबर २०२४ पासून भारताने खेळलेल्या सर्व १० कसोटी सामने खेळले आहे. त्यानंतर हंगामाच्या सुरुवातीच्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने एकच सामना खेळला. पंतने रणजी ट्रॉफीचा शेवटचा सामना डिसेंबर २०१७ मध्ये विदर्भाविरुद्ध खेळला होता.