

लखनौ; वृत्तसंस्था : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या रिंकू सिंगने यूपी टी-20 लीगमध्ये दमदार खेळीचा नजराणा पेश केला. या लीगमध्ये मेरठ मावेरिक्स संघाचे नेतृत्व करणार्या रिंकूने गौर गोरखपूर लायन्स विरुद्धच्या सामन्यात षटकारांची आतषबाजी करत 225 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्याचे पाहायला मिळाले.
लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गोरखूपर लायन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 167 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मेरठ मेवरिक्स संघाची सुरुवात खराब झाली. आकाश दुबे आणि स्वस्तिक चिकारा स्वस्तात माघारी फिरल्यावर ऋतुराज शर्मा आणि माधव कौशिक जोडीही फ्लॉप ठरली. अवघ्या 38 धावांत रिंकूच्या संघाने 4 विकेटस् गमावल्या होत्या. संघ संकटात असताना रिंकू सिंग याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश करत 48 चेंडूंत 108 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. 225 च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी करत रिंकूने संघाला अडचणीतून बाहेर काढत सामना जिंकून दिला.
रिंकू सिंग याने 2023 मध्ये भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आतापर्यंत त्याने 33 सामने खेळले असून 3 अर्धशतकांसह त्याच्या खात्यात 546 धावा जमा आहेत.
69 ही टीम इंडियाकडून केलेली त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी रिंकू सिंग याची भारतीय संघात निवड झाली आहे, पण या स्पर्धेत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठीही तगडी फाईट आहे. युपी टी-20 लीगमधील वादळी शतकी खेळीसह रिंकू सिंगने आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आपली दावेदारी भक्कम केली आहे.