

नवी दिल्ली : आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील घोषणा केली आहे. 4 जून रोजी संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 11 चाहत्यांच्या कुटुंबीयांना ‘आरसीबी केअर्स’ या नव्या उपक्रमांतर्गत प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने शनिवारी निवेदन जारी करत म्हटले, 4 जून रोजी आमची हृदये तुटली. आम्ही आरसीबी कुटुंबातील अकरा सदस्य गमावले. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून, करुणा, एकता आणि निरंतर काळजीचे वचन आहे, असेही संघाने स्पष्ट केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 व्या हंगामात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहली याला या विजयानंतर अश्रू अनावर झाले. विराट त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याने मैदानात रडू लागला. मैदानात चाहत्यांनी आरसीबी आरसीबी घोषणा दिल्या. आरसीबीच्या या विजयानंतर देशासह विदेशातही जल्लोष करण्यात आला. आता खेळाडूंचा घरच्यांकडून सन्मान व्हावा, यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलं हाेते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेवढी गर्दी स्टेडियमच्या आत होती त्याच्या दुप्पट गर्दी स्टेडियम बाहेर झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त पाच हजार पोलिस तैनात होते. तर दुसरीकडे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. ‘आमच्या पोलिसांची यात काहीही चूक नाही. आम्ही पोलिसांवर खापर फोडणार नाही. लाखो प्रेक्षक मैदानावर पोहोचल्याने ही दुर्घटना घडली’, असे त्यांनी सांगितले.
४ जूनला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL चॅम्पियन्स RCB संघाचे जंगी स्वागत करण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. लाखोच्या संख्येनं चाहता स्टेडियम परिसरात आला होता. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांनी आपला जीव गमावला होता. या घटनेच्या ३ महिन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझीनं दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.