

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२५ च्या हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात अनेक संघ बदललेले आहेत. काही संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळतील. या मध्ये आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही समावेश झाला आहे. आता रजत पाटीदारच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आरसीबीचा कर्णधार पदाचा शोध संपला आहे. गुरुवारी (दि.13) आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधाराची घोषणा केली आहे.
रजत पाटीदार हा निवडक खेळाडूंपैकी एक आहेत ज्यांना फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी कायम ठेवले आहे. पाटीदार याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. ३१ वर्षीय पाटीदारने मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले पण अंतिम सामन्यात त्यांना मुंबईकडून पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पाटीदार स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याच्या पुढे अजिंक्य रहाणे होता ज्याने १० सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने आणि १८६.०८ च्या स्ट्राईक रेटने ४२८ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा युवा फलंदाज रजत पाटीदार आयपीएलमध्ये आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. उजव्या हाताने खेळणारा हा आक्रमक फलंदाज मधल्या फळीत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रजत पाटीदारने 2021 साली RCB संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2022 हंगामात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. प्लेऑफमधील लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात नाबाद 112 धावांची शानदार खेळी करून तो चर्चेत आला. तो आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
रजतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 27 सामने खेळले आहेत. या एकूण सामन्यांमध्ये त्याने 799 धावा बनवल्या आहेत. यामध्ये एका तडाकेबाज शतकाचा देखील समावेश आहे. तर त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 7 अर्धशतके देखील आहेत. त्याचे आयपीएलमधील 34.74 च्या सरासरीने आणि 158.85 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो.
रजत पाटीदार हा आरसीबीचा कार्यभार स्वीकारणारा आठवा खेळाडू असेल. त्याच्या आधी केविन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हेटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस यासारख्या मोठ्या नावांनी या संघाचे नेतृत्व केले आहे. राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यानंतर आरसीबीची जबाबदारी स्वीकारणारा तो चौथा भारतीय असेल. आरसीबीचा कर्णधार बनल्यानंतर विराट कोहलीनेही रजत पाटीदार यांचे अभिनंदन केले आहे.