

नागपूर: गेल्यावेळी झालेल्या पराभवाचे उट्टे काढत आज (दि. २१) विदर्भ संघाने 42 वेळा रणजी विजेता (Ranji Trophy) संघ राहिलेल्या मुंबई संघाचा मोठ्या फरकाने पराभव करीत फायनल गाठली. रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 चा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि मुंबई क्रिकेट संघात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्याचा आज अंतिम पाचवा दिवस होता. विदर्भाने 80 धावांनी विजय मिळवला असून आता रणजीचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळवला जाईल. (Vidarbha vs Mumbai )
मागील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ आणि मुंबई यांच्यात खेळला गेला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने त्या सामन्यात 169 धावांनी शानदार विजय मिळवला. विदर्भाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 538 धावांची आवश्यकता होती. पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने शतक झळकावले तर, हर्ष दुबेनं 65 धावा केल्या होत्या. पण संघ पराभूत झाला.मुंबईने 42व्यांदा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकला होता. आता मात्र विदर्भाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत मुंबईची घोडदौड रोखली. आपल्या गेल्या पराभवाचा बदला घेतला. विदर्भाकडून हर्ष दुबे याने सर्वाधिक 5 बळी घेत आपली चमक दाखविली.
विक्रमी 42 वेळा रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला हा सामना जिंकत अंतिम फेरीत जाण्यासाठी आज सामन्याच्या पाचव्या दिवशी 323 धावांची आवश्यकता होती. मात्र त्यांची दिवसाची सुरुवातच खराब झाली.खेळ सुरु झाल्यावर मुंबईला चौथ्याच षटकात धक्का बसला. शिवम दुबे 12 धावा करुन यश ठाकुरचा बळी ठरला. त्यानंतर 42व्या षटकात सूर्या देखील बाद झाला. यानंतर आकाश आनंद देखील 39 धावांवर बाद झाला. शार्दुल ठाकुर (66) आणि शम्स मुलाणी (46) यांनी शतकी भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणन्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटच्या विकेटसाठी सुद्धा मोहित अवस्थी (34) आणि रॉयस्टन डायस (23) यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र संघाला विजय मिळविताच आला नाही.