आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग सुरू होण्यामागे क्रिकेटशी संबंधित व्यक्ती नाही तर एक टीव्ही चॅनेलचा मालक कारणीभूत आहे, हे बहुतेक जणांना माहीत नाही. मार्च-एप्रिल 2007 मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वषकात भारतीय संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला. यामुळे भारतीय चाहत्यांचा संताप उसळला होता. क्रिकेटपटूंबरोबरच बीसीसीआयवर चौफेर टीका होत होती. यात अनेक माजी क्रिकेटपटूही सहभागी होते. या नाराजीचा फायदा घेत झी मीडिया ग्रुपचे सुभाष चंद्रा यांनी इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) नावाची स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली. चंद्रा यांनी कपिल देव यांना आयसीएलचे अध्यक्ष बनवले; पण बीसीसीआयने या स्पर्धेला अनधिकृत घोषित केले. पाठोपाठ आयसीसीनेही आयसीएलमधील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्याचे जाहीर केले. त्यामुळे ही स्पर्धा 2009 मध्ये पॅकअप झाली.
मात्र, या स्पर्धेचे फॉरमॅट घेऊन बीसीसीआयने 2007 साली इंडियन प्रीमिअर लीगची स्थापना केली. बीसीसीआयने ललित मोदी यांच्याकडे या लीगची जबाबदारी सोपवली. 2008 साली इंडियन प्रीमिअर लीगची पहिली आवृत्ती पार पडली. 18 एप्रिल ते 1 जून 2008 अशी 45 दिवस ही स्पर्धा चालली. स्पर्धेत 8 संघांमध्ये एकूण 50 सामने खेळवण्यात आले.
या स्पर्धेसाठी संघाच्या मालकी विक्रीसाठी 24 जानेवारी 2008 मध्ये लिलाव पार पडला. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या मालकी हक्कासाठी 111.9 मिलियन डॉलर्स इतकी विक्रमी बोली लागली. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि डेक्कन चार्जर्स असे आठ संघ सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर (मुंबई), सौरव गांगुली (कोलकाता), राहुल द्रविड (बेेंगलोर), युवराज सिंग (मोहाली), वीरेंद्र सेहवाग (दिल्ली) हे खेळाडू त्या-त्या शहराच्या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणून निवडले गेले. उर्वरित खेळाडूंच्या संघ निवडीसाठी 20 फेब्रुवारी 2008 रोजी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात महेंद्रसिंग धोनीला सर्वात जास्त विक्रमी 1.5 मिलियन डॉलर्स इतकी किंमत मिळाली. चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेतले.
स्पर्धेचा पहिला सामना 18 एप्रिल 2008 रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांत बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. पहिल्या स्पर्धेची पहिली फायनल स्पर्धेच्या नावाला साजेशी धमाकेदार झाली. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 163 धावा केल्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्स संंघाने शेवटच्या चेंडूवर पूर्ण करून पहिल्या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले. 39 चेंडूंत 56 धावा करणारा युसूफ पठाण हा अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. राजस्थानचा सोहेल तन्वीर हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज 'पर्पल कॅप'चा तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा शॉन मार्श हा 'ऑरेंज कॅप'चा मानकरी ठरला.
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणार्या राजस्थान रॉयल्सला विजेता म्हणून 4.8 कोटी रुपये तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 2.4 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.