

नवी दिल्ली; वृत्तसेवा : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2026 हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स संघात मोठी उलथापालथ झाली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटची ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, द्रविड यांनी फ्रँचायझीने देऊ केलेली ‘वरिष्ठ पदाची’ ऑफर नाकारली आहे.
द्रविड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने खळबळ उडालेली असतानाच, संघाचा कर्णधार संजू सॅमसनदेखील संघ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना जोर आल्याने रॉयल्सच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. राजस्थान रॉयल्सने शनिवारी ‘एक्स’वर एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. निवेदनात म्हटले आहे की, राहुल अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिला आहे.
त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या एका पिढीला प्रभावित केले, संघात मजबूत मूल्ये रुजवली आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर एक अमिट छाप सोडली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, फ्रँचायझीच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून राहुलला संघात अधिक व्यापक भूमिकेची ऑफर देण्यात आली होती; परंतु त्यांनी ती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुल द्रविड यांचे फ्रँचायझीसाठी दिलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल मनःपूर्वक आभार मानत आहेत.
द्रविड यांना 2025 च्या हंगामापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या जाण्याने संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयपीएलच्या मिनी लिलावाला काही महिने शिल्लक असताना जर संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार दोघेही संघाबाहेर गेले, तर राजस्थान रॉयल्ससाठी ही एक अत्यंत अवघड परिस्थिती असेल. आता द्रविड आणि संभाव्यतः सॅमसन यांच्या जाण्याने संघाला नव्याने बांधणी करावी लागणार आहे.