पुढारी ऑनलाईन डेस्क : एका मुलाने स्वप्न पाहिले. ते साध्यही केले. माझ्यासाठी जेतेपद हा फक्त एक आकडा आहे. हे कदाचित लोकांना माहित असेल. लोकांनी मला कारकीर्दीत मिळालेल्या विजेतेपद किंवा पुरस्कारापेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून लक्षात ठेवावे, अशा शब्दांमध्ये महान टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने निवृत्तीच्या सामन्यानंतर टेनिसला निरोप दिला. यावेळी राफेलसह त्याचे चाहतेही भावूक झाले.
तब्बल १२ फ्रेंच ग्रँडस्लॅमवर आपली मोहर उमटवत लाल मातीवरील बादशाह, अशी ओळख निर्माण केलेल्या राफेल नदाल याने डेव्हिस कपसाठी सामना खेळत आज व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. 38 वर्षीय नदालला डेव्हिस कपच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सच्या गेंडशल्पकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर मलागा येथे निवृत्तीच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात राफेलसह त्याचे चाहतेही भावूक झाले.
नदाल म्हणाले की, मी जोर्का मधील एका छोट्या गावातील मुलगा नशीबवान ठरलो. कारण मी लहान असताना माझे काका टोनी नदाल यांनी गावातच टेनिसचे प्रशिक्षण दिले. माझे एक उत्तम कुटुंब होते. माझ्या कुटुंबाने मला प्रत्येक क्षणी साथ दिली. यावेळी राफेलने माजी प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे, सेरेना विल्यम्स आणि इतर टेनिस महान आणि सॉकर स्टार्स जसे राऊल आणि आंद्रेस इनिएस्टा यांचेही आभार मानले.
माझ्यासाठी जेतेपद हा फक्त एक आकडा आहे. लोकांनी मला जेतेपदापेक्षाही एक चांगली व्यक्ती, एक मुलगा म्हणून स्मरणात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. मी व्यावसायिक टेनिसचे जग सोडत आहे आणि वाटेत अनेक चांगले मित्र भेटले. 'मी शांत आहे कारण मला समोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले आहे. माझे एक चांगले कुटुंब आहे जे मला दररोज आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीत मदत करते, अशी कृतज्ञताही त्याने व्यक्त केली. आगामी वर्षांमध्ये टेनिससाठी एक चांगला राजदूत होण्याची आशा करतो, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. जगभरातील चाहत्यांचेही त्याने आभार मानले.
राफेल नदाल याने आपल्या टेनिस कारकिर्दीमध्ये एकूण २२ ग्रँडस्लॅमवर आपलं नाव कोरलं. यामध्ये १२ फ्रेंच ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन आणि चार यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये दोनवेळा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. इतकेच नाही तर २००४, २००९, २०११ आणि २०१९ मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही नदालचा समावेश होता. टेनिसमध्ये एका कॅलेंडर वर्षात चार ग्रँडस्लॅम स्पर्धांसह ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्या खेळाडू गोल्डन स्लॅम होता. जगात केवळ तीनच खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. त्यामुळे राफेल नदाल याच्या नावाचा समावेश आहे.