

शेंझेन (चीन); वृत्तसंस्था : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने गुरुवारी थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना अवघ्या 41 मिनिटांत संपला.
या विजयामुळे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने थाई खेळाडूविरुद्धच्या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये 6-5 अशी आघाडी घेतली आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना कोरियाच्या अव्वल मानांकित एन से यंग आणि डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड यांच्यातील विजेत्याशी होईल.-अलीकडेच हाँगकाँग ओपनमधून पहिल्याच फेरीत बाहेर पडलेल्या सिंधूने या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, मी या विजयामुळे खूप आनंदी आहे आणि सुरुवातीपासूनच सतर्क राहून 100 टक्के देणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. चोचुवोंग एक अव्वल खेळाडू आहे. इंडोनेशिया ओपनमध्येही आम्ही खेळलो होतो, तो सामनाही खूप कठीण होता. पहिला गेम जिंकल्यानंतर मी दुसर्या गेममध्ये अधिक सतर्क झाले.
सिंधूने पुढे सांगितले, गुण बरोबरीने जात होते, त्यामुळे प्रत्येक गुणाची किंमत असल्यामुळे तिच्या जवळ राहणे महत्त्वाचे होते. मला आनंद आहे की मी विजयी बाजूने आहे आणि मी माझे सर्वोत्तम दिले. आता मला उद्याच्या सामन्यासाठी तयारी करावी लागेल. सरळ गेममध्ये जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, पण लांबच्या सामन्यांसाठीही तयार राहिले पाहिजे आणि पायांमध्ये अधिक वेग असणे आवश्यक आहे.
पुरुष दुहेरीत भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने चायनीज तैपेईच्या हिसयांग चिएह चिऊ आणि वांग चि-लिन या जोडीला 32 मिनिटांत 21-13, 21-12 असे सहज हरवले.