

शेंझेन; वृत्तसंस्था : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अॅन से यंग विरुद्धचा खराब फॉर्म कायम राहिला आहे. शुक्रवारी ‘चायना मास्टर्स सुपर 750’ बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोरियन खेळाडू अॅन से यंगकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे सिंधू स्पर्धेतून बाहेर पडली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या 23 वर्षीय अॅन से यंगने सिंधूला 38 मिनिटांत 14-21, 13-21 अशा सरळ गेममध्ये हरवले. अॅन से यंगविरुद्ध सिंधूचा हा सलग आठवा पराभव असून, तिला अजूनही एकही सामना जिंकता आलेला नाही. पहिल्या गेममध्ये सिंधूने 1-6 अशी खराब सुरुवात केली, पण नंतर तिने 5-9 अशी आघाडी कमी केली.
मात्र, अॅनने तिचा ट्रेडमार्क स्मॅश वापरून 11-5 अशी आघाडी घेतली. सिंधूने 11-14 अशी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण कोरियन खेळाडूने आपली पकड कायम ठेवली आणि पहिला गेम जिंकला. दुसर्या गेममध्ये सिंधूने 3-2 अशी थोडी आघाडी घेतली, पण अॅनने लगेचच नियंत्रण मिळवले. सिंधूने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, पण अॅनच्या उत्कृष्ट वैविध्यपूर्ण खेळापुढे तिचा टिकाव लागला नाही. मध्यांतरापर्यंत अॅन 11-7 अशा आघाडीवर होती. नंतर अॅनने 14-7 अशी आघाडी घेतली आणि मागे वळून पाहिले नाही.