पंजाबची बल्ले बल्ले!

LSG vs PBKS : लखनौ सुपर जायंटस्वर 8 विकेटस्नी विजय
LSG vs PBKS
पंजाबने 8 विकेटस्ने विजय मिळवला. Ravi Choudhary
Published on
Updated on

लखनौ : मंगळवारी पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 13 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभवाचा धक्का दिला. पंजाबने 8 विकेटस्ने विजय मिळवला. हा पंजाबचा सलग दुसरा विजय ठरल्याने पॉईंटस् टेबलमध्येही त्यांनी 4 गुणांसह मोठी भरारी घेतली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणार्‍या लखनौचा मात्र हा तीन सामन्यांतील दुसरा पराभव आहे. या सामन्यात लखनौने पंजाबसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने 16.2 षटकांत 2 विकेटस् गमावत 177 धावा करून सहज पूर्ण केला. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग (69), श्रेयस अय्यर (52) आणि नेहल वढेरा (43) यांनी फलंदाजीत मोलाचे योगदान दिले.

लखनौच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली होती; पण तिसर्‍याच षटकात प्रियांश आर्यची विकेट गेली. त्याला दिग्वेश राठीने बाद केले; पण नंतर प्रभसिमरनने आक्रमक खेळ केला, त्याला कर्णधार श्रेयस अय्यरकडून भक्कम साथ मिळाली होती. प्रभसिमरनने अर्धशतकही साजरे केले. प्रभसिमरन आणि श्रेयस यांनी 84 धावांची भागीदारी करत पंजाबच्या विजयाचा पाया रचला. प्रभसिमरनला 11 व्या षटकात दिग्वेश राठीनेच रवी बिष्णोईच्या हातून झेलबाद केले. प्रभसिमरनने 34 चेंडूंत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर नेहल वढेराने श्रेयसची साथ देताना धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्यांच्यातही नाबाद 67 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान श्रेयस अय्यरने या हंगामातील सलग दुसरे अर्धशतकही साकारले. त्यानेच 17 व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर खणखणीत षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले आणि पंजाबच्या विजयावरही शिक्कामोर्तबही केले. श्रेयसने 30 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची नाबाद खेळी केली. नेहल वढेरा 25 चेंडूंत 43 धावांवर नाबाद राहिला. त्यानेही 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

तत्पूर्वी, या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौकडून एडन मार्कराम आणि मिचेल मार्श यांनी सलामीला फलंदाजी केली; पण पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मिचेल मार्शला शून्यावर माघारी धाडले; पण नंतर मार्कराम आणि निकोलस पूरन यांनी डाव सावरला होता. मार्कराम आक्रमक खेळत होता; पण चौथ्या षटकात त्याचा अडथळा पंजाबकडून पदार्पण केलेल्या लॉकी फर्ग्युसनने दूर केला. त्याने मार्करामला त्रिफळाचीत केले. मार्करामने 4 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा केल्या. पाठोपाठ कर्णधार ऋषभ पंतही 2 धावांवर बाद झाला. त्याला ग्लेन मॅक्सवेलने युझवेंद्र चहलच्या हातून झेलबाद केले. पण नंतर निकोलस पूरनने आयुष बडोनीला साथीला घेत आक्रमक खेळ सुरू केला. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. ही भागीदारी धोकादायक ठरेल, असे वाटत असतानाच 12 व्या षटकात पूरनला युझवेंद्र चहलने ग्लेन मॅक्सवेलच्या हातून बाद केले. पूरनने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 30 चेंडूंत 44 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक 6 धावांनी हुकले. नंतर डेव्हिड मिलर बडोनीला साथ देत होता; पण त्यालाही 16 व्या षटकात 19 धावांवर मार्को यान्सिनने बाद केले. पण अब्दुल सामदने बडोनीला भक्कम साथ दिली. बडोनी अर्धशतक पूर्ण करेल, असे वाटत होते; पण शेवटच्या षटकात बडोनी (41) आणि सामद (27) या दोघांनाही अर्शदीप सिंगने बाद केले; पण त्यांच्या आक्रमणामुळे पंजाबने 20 षटकांत 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपरजायंटस् : 20 षटकांत 7 बाद 171 धावा. (निकोलस पूरन 44, आयूष बदोनी 41. अर्शदीप सिंग 3/43.)

पंजाब किंग्ज : 16.2 षटकांत 2 बाद 177 धावा. (प्रभसिमरन सिंग 69, श्रेयस अय्यर 52*, नेहाल वढेरा 43. दिग्वेश राठी 2/30.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news