

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गहूंजे स्टेडियमवर आज (दि. ३१) सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या भारत आणि इंग्लंड 'टी-२०' क्रिकेट सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान गहुंजे परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. वाहने पार्किंगसाठी 45 एकरवर सुविधा करण्यात आल्या आहेत. स्टेडियमची क्षमता 37 हजार प्रेक्षकांची आहे. 35 ते 40 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज बांधत पोलिसांनी वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत हे बदल लागू राहतील.
वाहनांच्या पार्किंगसाठी 45 एकरवर 12 स्लॉट उपलब्ध केले आहेत. थेट स्टेडियमच्या ठिकाणी कोणतेही वाहन घेऊन न येता, नेमून दिलेल्या ठिकाणीच वाहनांचे पार्किंग करावे, पाण्याच्या बाटल्या, कापडी फलक, पिशव्या, पर्स अशा कोणत्याही वस्तू स्टेडिअमवर घेऊन येण्यास मज्जाव केला आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, अत्यावश्यक सेवा, पासधारक वाहनांना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा वापर करता येईल.
- द्रुतगती मार्गाच्या एक्झिटवरून डावीकडे वळून, मामुर्डीच्या बाजूच्या सर्व्हिस रोडने स्टेडिअम व पार्किंगकडे जावे.
- द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे ब्रिजवरून सिम्बायोसिस कॉलेज बाजूच्या सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जातील.
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गानी येणाऱ्या वाहनांनी सेंट्रल चौकातून 'यू-टर्न' घेऊन साई नगर फाटा मार्गे पार्किंगकडे जावे.
- सोमाटणे फाटा आणि सेंट्रल चौक मार्गे येणाऱ्या वाहनांना शितळा देवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी.
- बंगळूर महामार्गावरून पवना नदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पार करून किवळे ब्रिजवरून डावीकडे वळून सर्व्हिस रोडने जावे.
- निगडी, हँगिंग ब्रिजमार्गे येणाऱ्या वाहनांनी रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक, कृष्णा चौकमार्गे उजवीकडे वळून एक्स्प्रेस वेपासून डावीकडे वळून सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
- गहुंजे पूल ते वाय जंक्शनमार्गे फक्त कार पासधारक आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश राहणार आहे.