

बीजिंग; वृत्तसंस्था : चायना पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रमोद भगत, सुकांत कदम आणि कृष्णा नगर यांनी शानदार कामगिरी साकारत भारताला यश मिळवून दिले. प्रमोद भगतने सुवर्ण व रौप्य पदक पटकावले तर सुकांत कदम, कृष्णा नगर यांनीही लक्षवेधी कामगिरी साकारली. या कामगिरीने जागतिक पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित केले.
अव्वल खेळाडू प्रमोद भगतने 18 महिन्यांनंतर शानदार पुनरागमन करत पुरुष एकेरीच्या एसएल3 प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मुह अल इम्रानकडून 15-2 असा पहिला गेम गमावल्यानंतर त्याने 21-19, 21-16 अशा फरकाने पुनरागमन केले आणि थरारक सामन्यात सुवर्णपदक जिंकले.
पुरुष दुहेरीमध्ये, त्याने सुकांत कदमसोबत भागीदारी केली आणि अंतिम सामन्यात भारतीय खेळाडू जगदीश दिल्ली आणि नवीन शिवकुमार यांच्याकडून 18-21, 22-20, 18-21 असा पराभव झाल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सुकांत कदमने पुरुष एकेरीच्या एसएल 4 प्रकारात दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याला फ्रान्सच्या लुकास माझूरकडून 9-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला.