कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पहाटेच्या अंधारात धुक्यातून वाट काढत हजारो अबालवृद्ध सुदृढ आरोग्यासाठी धावले. निमित्तं होतं कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रग्गेडियन क्लब आयोजित 5 व्या 'कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन'चे. प्रतिवर्षीप्रमाणे मॅरेथॉनला भरघोस प्रतिसाद लाभला. सुमारे 5 हजार स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध अंतरांची मॅरेथॉन फत्ते करून स्पर्धकांनी मेडल-सर्टिफिकेटसह कोल्हापुरी फेटा परिधान करून देशाच्या तिरंगा ध्वजासोबत अभिमानाने सेल्फी काढला.
भावी पिढी सुदृढ-सक्षम आणि निर्व्यसनी राहावी, या उद्देशाने करवीरनगरी कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पेठापेठांत तालीम परंपरा निर्माण करून ती विकसित केली. यापुढे जाऊन क्रीडानगरीचा भक्कम पाया रोवला. पारंपरिक खेळाप्रमाणेच नवनवीन खेळांना प्रोत्साहन व पाठबळ दिले. लोकराजाच्या या लोकोपयोगी कार्याचा वारसा जपावा, लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येक 'कोल्हापूरकर फिट व्हावा' या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्टस् क्लब व रग्गेडियन क्लबतर्फे 'कोल्हापूर अल्ट्रा रन' मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. याला दैनिक 'पुढारी'चे भक्कम पाठबळ असते.
फ्लॅग ऑफने मॅरेथॉनचा प्रारंभ
प्रतिवर्षीप्रमाणे मॅरेथॉनची सुरुवात रविवारी पहाटे पोलिस कवायत मैदानापासून झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते आणि उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, दैनिक 'पुढारी'चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे मार्गदर्शक विश्वविजय खानविलकर, अध्यक्ष चेतन चव्हाण, कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर, रग्गेडियन क्लबचे उप्पल शहा, जयेश ओसवाल, डॉ. विजय कुलकर्णी, जयेश कदम, डॉ. प्रदीप पाटील, आकाश कोरगावकर, आशिष तंबाके, आदित्य शिंदे, एस. आर. पाटील, महेश शेळके, राज कोरगावकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरही धावले
मॅरेथॉनसाठी उपस्थित स्पर्धकांचा उत्साह पाहून मान्यवरांनाही राहावले नाही. ते ही अबालवृद्धांसह मोठ्या उत्साहात धावले. यात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे मार्गदर्शक विश्वविजय खानविलकर, एक्साईज अधिकारी गणेश पाटील, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह डॉक्टर्स, वकील, शासकीय अधिकारी, शहर व ग्रामीण भागातील अधिकारी आदींचा समावेश होता.
विविध संस्था-संघटनांचा सहभाग
स्पर्धेचे असोसिएट पार्टनर दैनिक 'पुढारी', सपोर्टेड पार्टनर जेके ग्रुप, डीवायपी मॉल, प्रो 10 न्युट्रिशन, ट्रेनिंग पार्टनर योस्का, इव्हेंट पार्टनर आयर्नमॅन 70.3 गोवा, फ्युएल पार्टनर कोरगावकर पंप शिरोली फिटनेस पार्टनर एमएमडी मॅट्रिक्स जिम, सहभागी पार्टनर श्राईन स्कोडा, रेडिओ पार्टनर टोमॅटो एफएम आदी होते.
अबालवृद्धांचा सहभाग
'शाहूनगरी' कोल्हापूरला असणार्या क्रीडा क्षेत्राच्या प्रदीर्घ परंपरेमुळे हे शहर 'फिट सिटी' म्हणून नावारुपाला आहे. पारंपरिक खेळापासून ते अत्याधुनिक साहसी खेळांमध्ये इथल्या खेळाडूंनी राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दबदबा निर्माण केला आहे. या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने होणार्या या मॅरेथॉनमध्ये खेळाडूंबरोबरच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्त्री-पुरुष, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिकांसह नोकरदार, उद्योजक, राजकारणी, वकील, डॉक्टर यासह प्रत्येक घटकातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशभरातील विविध राज्यांसह परदेशातील अबालवृद्ध स्पर्धकांनी, सहकुटुंब व मित्र परिवारासह मॅरेथॉन पूर्ण केली.
300 स्वयंसेवकांसह विविध समित्या
मॅरेथॉनच्या नेटक्या संयोजनासाठी 300 स्वयंसेवकांसह विविध समित्या सक्रिय होत्या. कोल्हापूर पोलिस दल, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर महानगरपालिका यांच्यासह विविध सेवाभावी संस्था-संघटनांनी 'कोल्हापूर रन' यशस्वी करण्यात सहभाग दिला.
मॅरेथॉनचे अंतर व मार्ग
कोल्हापूर रन मॅरेथॉन 5, 10, 21, 42 आणि 50 कि.मी.अशा पाच गटांत झाली. पोलिस मैदानावर स्टार्ट व फिनिश पाईंट होता. पोलिस ग्राऊंड-धैर्यप्रसाद चौक-सर्किट हाऊस-लाईन बझार-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-कावळा नाका-मिलिटरी कॅम्प-शिवाजी विद्यापीठरोड या मार्गावर मॅरेथॉन धावली. 50 कि.मी. अंतराची स्पर्धा पहाटे 3 वाजता सुरू झाली. या मॅरेथॉनचा मार्ग लाईन बाजार, सर्किट हाऊस, कावळा नाका, उड्डाण पूल, शिवाजी विद्यापीठ, शाहू टोल नाका पुन्हा शिवाजी विद्यापीठ, उड्डाण पूल, कावळा नाका, पोलिस ग्राऊंड, सेंट झेवियर्स स्कूल, महावीर कॉलेज, सीपीआर, महापालिका, शिवाजी पुतळा, गुजरी कॉर्नर, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर, पुन्हा महावीर कॉलेज, कसबा बावडा रोड, पोलिस ग्राऊंड असा होता. 42 कि.मी. स्पर्धा पहाटे 4 वाजता सुरू झाली. तर 21 कि.मी. अंतराची मॅरेथॉन सकाळी 6 वाजता सुरू झाली. पोलिस ग्राऊंड येथून सुरू झाली. मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा क्रीडाप्रेमी नागरिक स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ते खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. आपआपल्या गटाचे अंतर पार केल्यानंतर फिनिशिंग लाईन क्रास करताना प्रत्येक स्पर्धक जग जिंकल्याच्या आवेशात आपला आनंदोत्सव साजरा करत होता. इतकेच नव्हे तर मेडल व प्रमाणपत्र घेतल्यानंतर सेल्फी पॉईंटला अभिमानाने सेल्फी काढत होता. पहाटे 3 वाजता सुरू झालेल्या मॅरेथॉनचा थरार सुमारे आठ तासांनी म्हणजेच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संपला.
सेल्फी पॉईंटवर झुंबड
पोलिस कवायत मैदानावर बनविण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती. मॅरेथॉन पूर्ण करून येणारे सहभागी मेडल व सर्टिफिकेट घेऊन या सेल्फी पॉईंटवर येत होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक वैभव असणार्या जुना राजवाडा, नवा राजवाडा, रंकाळा तलाव, शिवाजी विद्यापीठ, दसरा चौक आदींचे फोटो असणार्या फलकांसोबत हे सेल्फी पॉईंट बनविण्यात आले होते. तसेच याठिकाणी ठेवण्यात आलेला रथही लक्षवेधी ठरला.
मर्दानी कलेची प्रात्यक्षिके
मैदानावर उत्तरेश्वर मर्दानी खेळाचा आखाड्याच्या श्रीकृष्ण प्रभूलकर व सहकार्यांनी मर्दानी कलेची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. लाठी, दांडपट्टा, तलवार, लिंबू काढणी, फरीगदगा यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना सहभागिंनी दाद दिली.
फलाहारासह भरपेट नाश्ताही
मॅरेथॉन संपवून पोलिस कवायत मैदानावर येणार्या सहभागींसाठी चहा, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, संत्री, केळी, मोसंबी, द्राक्षे यासह शिरा, उपीट, केक व चहा असा भरपेट नाश्ता पुरविण्यात आला. तसेच मॅरेथॉन मार्गावरही ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व फळे देण्यात आली.
हलगी, बँडमुळे उत्साह
सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी मॅरेथॉन मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हलगी, बँड ठेवण्यात आला. धैर्यप्रसाद चौकात बँड पथक तर महासैनिक दरबार परिसरात हलगी, घुमक्याचा ठेका सहभागींच्या कानावर पडत होता. धावताना थकवा जाणवत असतानाही अनेकांनी हलकीच्या ठेक्यावर नृत्य केले.
तिरंगा ध्वज ते कोल्हापुरी फेटा
मॅरेथॉनमध्ये सहभागींपैकी काहीजण तिरंगा ध्वज घेऊन धावले. तर काहींनी मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर कोल्हापुरी फेटा डोक्यावर बांधून फोटो घेतले. तिरंगा ध्वजासोबत फोटो घेण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती.
झुंबासोबत ठेका
पोलिस कवायत मैदानावरील प्रेक्षक गॅलरीत साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली होती. साऊंड सिस्टीमवर वाजणार्या शंकरा रे शंकरा… बाला ओ बाला… गाण्यांवर सहभागींनी ठेका धरला. फिनिश लाईनसमोर सर्वांनी गर्दी केली होती. तसेच यानंतर झुंबा डान्सचाही उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला. कोल्हापुरी ढोल सिंहगर्जना, आर्यन बिटस् यांनीही सहभागींचा उत्साह वाढविला.
दिव्यांग खेळाडूंचा सहभाग
व्हीलचेअर क्रिकेटचा प्रचार व्हावा, यासाठी चार पॅराखेळाडू (दिव्यांग) मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. विकास चौगले, उमेश चटके, संतोष रांजगणे व संतोष घोडके अशी चौघांची नावे आहेत. व्हीलचेअरवरून या चौघांनी सहभाग नोंदविला. हे क्रिकेट व टेबल टेनिसचे खेळाडू आहेत.