

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पेनचे दिग्गज फुटबॉलपटू झेवियर हर्नांडेझ आणि पेप गार्डिओला यांनी अर्ज केल्याच्या वृत्ताने उडालेली खळबळ अखेर निव्वळ अफवा ठरली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एक निवेदन जारी करून हे अर्ज बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे भारतीय फुटबॉल वर्तुळातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी, एआयएफएफच्या राष्ट्रीय संघ संचालकांनी झेवियर यांचे नाव अर्जदारांच्या यादीत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे, तर तांत्रिक समितीच्या एका सदस्याने झेवियर हे ‘खूप खर्चिक’ उमेदवार असल्याने त्यांचा विचार केला जाणार नाही, असेही म्हटले होते. मात्र, एआयएफएफने आपल्या ताज्या निवेदनात खुलासा केला की, महासंघाला झेवियर आणि गार्डिओला या दोघांच्या नावाचे अर्ज एका ई-मेलद्वारे प्राप्त झाले होते. या अर्जांच्या सत्यतेची पडताळणी होऊ शकली नाही आणि नंतर ते बनावट असल्याचे उघड झाले. मँचेस्टर सिटीचे व्यवस्थापक गार्डिओला यांच्या नावानेही अर्ज आल्याची माहिती या निवेदनामुळे प्रथमच समोर आली.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना पदावरून हटवल्यानंतर एआयएफएफ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी महासंघाला एकूण 170 अर्ज प्राप्त झाले होते. तांत्रिक समितीने यामधून 10 उमेदवारांची निवड करून अंतिम यादीत तीन नावांचा समावेश केला आहे.