

कोलंबो : पाकिस्तानच्या महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक मोहम्मद वसीमने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी सामना शुल्क समान असावे, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. याबाबत ‘पीसीबी’ने ‘बीसीसीआय’चा आदर्श घ्यावा, असेही तो म्हणाला.
आशिया चषकापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद वसीम म्हणाला की, भारताने पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेदेखील असा विचार करायला हवा; पण त्यांच्यासमोर इतर काही आव्हाने आहेत.
क्रिकेटमध्ये समानता आणणे गरजेचे आहे. महिला खेळाडूंनाही चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. यासाठी खूप काम करावे लागेल. पाकिस्तानच्या महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट, मानधन, इतर सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक लक्ष द्यायला हवे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समानता आणल्याशिवाय महिला क्रिकेट नव्या उंचीवर जाणार नाही.