

लाहोर; वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान सामन्यावरून झालेल्या वादानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंडस् स्पर्धेच्या आयोजकांवर पक्षपातीपणा आणि ढोंगीपणाचा आरोप करत, पीसीबीने भविष्यात या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर सरसकट बंदी घातली आहे.
हा संपूर्ण वाद पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झाला. राष्ट्रीय भावना लक्षात घेऊन भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणार होते, मात्र भारताने दोन्ही सामन्यांतून माघार घेतली.
या स्पर्धेत भारताने गट फेरीतील सामन्यातून माघार घेतली. शिखर धवन आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंनी आधीच स्पर्धेतून नाव मागे घेतले होते. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीतही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे पाकिस्तानला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यादरम्यान सामना न खेळताही भारताला गुण देण्याच्या आयोजकांच्या निर्णयावर पीसीबीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या 79व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जाणूनबुजून सामना सोडणार्या संघाला गुण देण्याचे डब्ल्यूसीएलचे वर्तन निराशाजनक आणि खेळ भावनेच्या विरोधात आहे. भारत-पाक सामने रद्द करताना आयोजकांनी प्रसिद्ध केलेली निवेदने ढोंगी आणि पक्षपाती होती. त्यामुळे या स्पर्धेत भविष्यात सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.