

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका क्षणात त्याचे सारं आयुष्य बदललं. जीवघेणा अपघात झाला. त्याच्यातील 'क्रिकेट' संपलं, अशी चर्चाही सुरु झाली. मात्र त्याचा केवळ स्वत:वर विश्वास होता. कोणताही चमत्कार होणार नाही, याची त्याला जाणीव होती. जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर पुन्हा उभे राहत आपणच 'चमत्कार' करायचा, असा निर्धार त्याने केला. अखेर हाच निर्धार कामी आला. तो पुन्हा एकदा ताठ मानेने मैदानात खेळण्यासाठी उभा राहिला. ही गोष्ट आहे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याची. 2022 साली अपघातानंतर क्रिकेटपासून दूर गेलेल्या ऋषभ पंतने कसोटी पुनरागमनच्या सामन्यात आज बांगला देशविरूद्ध शानदार खेळी करत शतक झळकावले.
तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 205 धावा केल्या. भारताकडे एकूण आघाडी 432 धावांची आहे. ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी १६७ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या सत्रात 28 षटकांत 124 धावा जोडल्या. दोघांनी 4.43 च्या रन रेटने धावा केल्या. भारताने केवळ 67 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर पंत आणि गिल यांच्या जाेडीच्या खेळीने भारताला या सामन्यात निणार्यक आघाडी मिळवून दिली आहे. शुक्रवारी यशस्वी जैस्वाल १० धावा करून, रोहित शर्मा ५ धावा करून आणि विराट कोहली १७ धावा करून बाद झाला हाेता. शानदार शतक झळकवल्यानंतर 109 धावांवर खेळणाऱ्या पंतला मेहंदी हसनने बाद केले.
ऋषभ पंतवर उपचार करणारे डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी पंतच्या पुनरागमनाची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) काही महिन्यापूर्वी शेअर केला हाेता. या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी ऋषभ पंत याला 'मिरॅकल मॅन' असे संबोधले हाेते.
२०२२ मध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर गेली दीड वर्ष त्याने अतोनात हाल सहन केले. शरीर साथ देत नव्हतं;पण तो मनाने हरला नाही. कुबड्या घेवून चालण्यापासून मैदानावर पुन्हा धावण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास कोणालाही चमत्कारापेक्षा कमी वाटणार नाही. . त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला हेही तो पूर्ण बरा होईल का, याबाबत साशंक होते.
डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला सांगतात, भीषण अपघातात ऋषभच्या गुडघ्याचे हाड निखळले होते. म्हणजेच ते जागेवरून घसरले होते. अशा परिस्थितीत हे खूप कठीण आहे, असे मी त्याला सांगितले. यावर ऋषभ म्हणाला होता की, 'मी एक चमत्कारी माणूस आहे. मला दोनदा गंभीर दुखापत झाली आहे, पण मी बरा झालो आहे. तिसऱ्यांदाही मी नक्कीच बरा होईन'. झालेही तसेच ऋषभ हा 'चमत्कार करणारा माणूस' आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरतो आहे हा एक चमत्कार आहे., असेही पार्डीवाला यांनी म्हटलं आहे.
भीषण अपघातानंतर ऋषभला अनेक जखमा झाल्या. गुडघ्याचे एकही हाड योग्य स्थितीत नव्हते.त्याच्या उजव्या गुडघ्यावर लिगामेंटची शस्त्रक्रिया झाली.एवढ्या भीषण अपघातानंतर कोणी पुनरागमन करू शकत असेल तर तो फक्त ऋषभ पंत आहे. ज्या प्रकारची त्याची वृत्ती आहे, तो काहीही करू शकतो. त्याच्या प्रगतीसाठी तो ज्या प्रकारे मेहनत घेत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी म्हटलं आहे.
26 वर्षीय ऋषभने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपली फिटनेस टेस्ट दिली. तो फीट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर ऋषभ अधिक मजबूत झाला आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेचा एक विशिष्ट प्रकारचा परिणाम असतो. मला वाटते की, दुसरे काही नाही तर एका दुर्घटनेने एक चांगला माणूस बनवले आहे. त्याने आपल्या जीवनाचा आदर केला आहे, त्याच्या सभोवतालच्या गोष्टींचा आदर केला आहे. तो अधिक लवचिक आणि मजबूत झाला आहे, असे , NCA मधील कंडिशनिंग तज्ञ निशांत बोरदोलोई यांनी सांगितले.