

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : बहरीनमधील एका खाजगी स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानी कबड्डीपटू ओबैदुल्ला राजपूतवर पाकच्या कबड्डी संघटनेने अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर, पाकिस्तान कबड्डी महासंघाने या कारवाईची घोषणा केली. महासंघाकडून किंवा इतर संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता, परदेशात खेळण्यासाठी प्रवास केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले.
राजपूतने मात्र याबाबत मोठा गैरसमज झाल्याचा दावा केला. खासगी स्पर्धेत ज्या संघाकडून तो खेळणार होता, तो भारतीय संघ असेल हे शेवटपर्यंत माहिती नव्हते, असे त्याने म्हटले आणि याबाबत माफीही मागितली. मात्र, यानंतरही पाकिस्तानी कबड्डी संघटनेने त्याच्यावर कारवाई केली. ‘जीसीसी कप’ दरम्यान राजपूतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.