
xShahid Afridi Dubai event uninvited guest Kerala group CUBAA India Pakistan issue
दुबई : भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा गौरव करण्यात आला, ज्यामुळे भारतीय समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः केरळच्या Cochin University B.Tech Alumni Association (CUBAA) या संघटनेवर टीकेची झोड उठली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आफ्रिदी आणि त्याचा माजी सहकारी उमर गुल यांना स्टेजवर स्वागत करताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा आणि “बूम बूम” अशा घोषणांचा वर्षाव होत असताना आफ्रिदीने हसत “हो गया बूम बूम!”, असे प्रत्युत्तर दिले.
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (ज्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला), आफ्रिदीने पाकिस्तानी टेलिव्हिजनवर भारताच्या सुरक्षा यंत्रणेवर टीका केली होती.
त्याने म्हटले होते की, "तुमच्याकडे 8 लाखांची फौज आहे आणि तरीसुद्धा काश्मीरमध्ये हे घडतंय म्हणजे तुम्ही नालायक आहात, निकम्मे आहात. तुम्हाला लोकांना सुरक्षितता देता आली नाही."
तसेच, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानातील सुरक्षा तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आफ्रिदीने पाकमध्ये कार रॅली काढून 'विजय' साजरा केली होती.
वाद वाढल्यानंतर, CUBAA ने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे की, शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.
“25 मे रोजी आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपत असताना, एकाच वेळी त्या ठिकाणी ‘हस्तछापांनी बनवलेला सर्वात मोठा यूएई ध्वज या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमासाठी हे क्रिकेटपटू उपस्थित होते. त्याच वेळी ते आमच्या कार्यक्रमस्थळी अनाहूतपणे आले.
आमच्याकडून कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सदस्याने त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं, हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो,” असे CUBAA ने म्हटले.
दरम्यान, केरळमधील नागरिकांनी CUBAA आणि संबंधित कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचं स्वागत करणं हे कोणत्याही भारतीय संघटनेला शोभणारं नाही, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
शाहिद आफ्रिदीच्या धडाकेबाज खेळामुळे त्याला Boom Boom Afridi असं नाव मिळालं. Boom Boom म्हणजे काही क्षणांत स्फोट घडवून आणणारा — त्याप्रमाणे तो काही चेंडूमध्ये गोलंदाजांची धुलाई करत मोठी धावसंख्या उभारत होता.
1996 मध्ये आफ्रिदीने श्रीलंकेविरूद्ध खेळताना 37 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं, जे त्या काळात एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक होतं. यामुळे क्रिकेटप्रेमी आणि समालोचकांनी त्याला "Boom Boom" म्हणायला सुरुवात केली.
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडुत शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स याच्या नावावर आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध 31 चेंडूत शतक झळकावलं होतं. एकूण 44 चेंडूत त्याने 149 धावा फटकावल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कोरी अँडरसन आहे. त्याने 2014 मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध 36 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याने 47 चेंडूत नाबाद 131 धावा फटकावल्या होत्या.
तर तिसऱ्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदीचे 36 चेंडूतील शतक आहे. तेव्हा त्याने 40 चेंडूत102 धावा केल्या होत्या.