पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्नाच्या १० वर्षांनंतर घटस्फोट दिला. या दोघांना इझान नावाचा एक मुलगाही आहे. सानियाशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएबने पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री आयशा उमरसोबत दुसरे लग्न केले आहे. तर दुसरीकडे आता आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर राजा हसन भारतीय वंशाच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. हसनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.
पूजा बोमन असे भारतीय वंशाच्या मुलीचे नाव आहे. हसन लवकरच या मुलीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, या जोडप्याने आधीच लग्न केल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजाला इस्लाममध्ये खूप रस आहे आणि असे बोलले जात आहे की, हसनशी लग्न करण्यापूर्वी ती हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार करू शकते.
हसनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी एंगेज्ड झालो आहे. मी तिला विचारले की तू माझी जीवनसाथी होशील का? आणि तिने हो म्हणून सांगितले. आम्ही आमचे पुढचे सहजीवन एकत्र सुरू करण्यासाठी आता आणखी थांबू शकत नाही." हसनने त्याची भावी पत्नी पूजा बोमनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजा हसन पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पूजा बोमनसोबत लग्न करणार आहे. राजा हसनने 2012 ते 2014 दरम्यान पाकिस्तानसाठी 10 टी-20 आणि एक वनडे सामने खेळले आहेत. राजा हसनने पाकिस्तानकडून टी-20 क्रिकेटमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. तर, 48 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 29.05 च्या सरासरीने 149 बळी घेतले आहेत.