पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानबाहेर खेळण्यास नकार देणार्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता T20I द्विपक्षीय मालिकेसाठी भारताला आमंत्रित करण्याची शक्यता आहे. 'पीसीबी'चे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पुढील वर्षी तटस्थ ठिकाणी T20 मालिकेसाठी भारताला विनंती करण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'IANS'ने 'पीसीबी'च्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
पीसीबीच्या सूत्रांनी म्हटलं आहे की, अध्यक्ष मोहसीन नक्वी हे 2025 मध्ये तटस्थ ठिकाणी टी-20 मालिकेसाठी भारताला आमंत्रित करतील, 19-22 जुलै रोजी कोलंबो, श्रीलंका येथे होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे( BCCI) सचिव जय शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीवेळी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोन्ही संघांच्या मोकळ्या दिवसांमध्ये T-20 मालिकेच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल."
मोहसीन नक्वी आणि जय शहा यांच्या होणारी चर्चा ही वार्षिक परिषदेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने तटस्थ ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतही चर्चा होईल. भारत सरकारसह बीसीसीआयने सुरक्षा आणि राजकीय चिंतांमुळे भारतीय क्रिकेट संघातला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देवू शकत नाही. भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने (CT) लाहोरमध्ये खेळवले जातील आणि भारतीय संघ संपूर्ण मालिकेत त्याच हॉटेलमध्ये राहतील, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. एका शहरात सामने होणार असल्याचे भारतीय क्रिकेट संघाला सुरक्षा प्रदान करणे सोपे जाईल, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या नियोजनाबाबत पीसीबीने नुकतेच जाहीर केले होते की, लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियमला पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी जमीन संपादित केली आहे. पीसीबीने स्वतः हॉटेल बांधणार असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीला बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही पीसीबीच्या सूत्रांनी म्हटलं आहे. नव्याने बांधलेल्या पंचतारांकित हॉटेलमुळे भारतीय क्रिकेट संघाला स्टेडियमपासून लांब असणार्या हॉटेलमध्ये राहण्याची गरज राहणार नाही. तसेच यामुळे सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होणार नाही.
कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) वार्षिक परिषद होणार आहे. या परिषदेमध्येच पीसीबी प्रमुख अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची भेट होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये खेळावे यासाठी यावेळी नक्वी शहांना विनंती करतील. अर्थात याबाबतचा अखेरचा निर्णय भारत सरकारच घेणार आहे.
मागील वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, ज्यामुळे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. २०१२ पासून पाकिस्तान आणि भारत यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारत सरकारने पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट समाने हे केवळ आयसीसी आणि एसीसी कार्यक्रमांपुरते मर्यादित ठेवले आहे.