

मँचेस्टर; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा खेळाडू हैदर अली एका मोठ्या कायदेशीर संकटात सापडला आहे. इंग्लंड दौर्यावर असताना 24 वर्षीय हैदर अलीवर बलात्काराचा अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
23 जुलै रोजी हैदर अलीने मँचेस्टरमध्ये बलात्कार केल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर इंग्लंड दौर्यावर असलेल्या 24 वर्षीय फलंदाजाला अटक करण्यात आली आहे. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी हैदर अलीच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 4 ऑगस्ट 2025 रोजी बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या महिन्यात 23 जुलै रोजी घडली. हैदर अली पाकिस्तानच्या ‘शाहीन’ संघासोबत इंग्लंड दौर्यावर होता. केंट काऊंटीच्या बेकेनहॅम मैदानावर इंग्लंड लायन्सविरुद्ध सामना सुरू असतानाच ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला मैदानावरूनच अटक केली. या अनपेक्षित कारवाईमुळे सर्वांनाच धक्का बसला. अटकेनंतर हैदर अलीची कसून चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मात्र, जामीन मिळाला असला तरी त्याच्यावरील गंभीर आरोप अद्याप कायम आहेत आणि त्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.
या गंभीर आरोपांची माहिती मिळताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणतीही दिरंगाई न करता हैदर अलीला तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे.
इंग्लंडमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यात आरोपीला कमाल जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते. गुन्ह्याची तीव्रता आणि क्रूरता लक्षात घेऊन शिक्षा निश्चित केली जाते. त्यामुळेच हैदर अलीसाठी पुढील काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
24 वर्षीय हैदर अलीने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 37 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, तो संघातील एक महत्त्वाचा युवा खेळाडू मानला जातो. मात्र, या आरोपामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.