

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज तय्यब ताहिर अगदी थोडक्यात गंभीर अपघातापासून वाचला. माउंट मानुगाउई येथील बे ओव्हल मैदानात पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना, ३९व्या ओव्हरमध्ये अचानक स्टेडियममधील वीज गेली. त्याच क्षणी न्यूझीलंडचा गोलंदाज जॅकब डफी चेंडू टाकत होता आणि तय्यब ताहिर स्ट्राइकवर होता.
डफीने चेंडू सोडला आणि त्याच वेळी स्टेडियमच्या फ्लडलाईट्स बंद झाल्या. अंधार पसरताच ताहिर क्रीज सोडून मागे पळताना दिसून आला. अंधारात कमेंटेटर्ससुद्धा काही वेळ गोंधळले. चेंडू नक्की कुठे गेला, विकेटकिपरने तो झेलला का नाही, हे स्पष्ट दिसले नाही. सुदैवाने, कोणताही अपघात झाला नाही आणि ताहिरला दुखापत टळली.या सामन्यात ताहिरने ३१ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ताहिर कसा अचानक अंधारात पळाला हे स्पष्ट दिसते.
या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ४७ धावांनी पराभूत करत वनडे मालिका ३-० ने जिंकली. याआधी त्यांनी टी२० मालिका ४-१ ने जिंकली होती. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने ४२ षटकांत ८ बाद २६८ धावा केल्या. मायकल ब्रॅसवेलने ५९ आणि रियस मारियूने ५८ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून अकीफ जावेदने ४ तर नसीम शाहने २ बळी घेतले. २६५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी २ बाद ९७ धावा केल्या. मात्र, नंतरची कामगिरी ढासळली. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने ५ बळी घेतले. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ५०, मोहम्मद रिझवानने ३७ तर तय्यब ताहिर आणि अब्दुल्ला शफी यांनी प्रत्येकी ३३ धावा केल्या.