पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा अनुभवी फिरकीपटू नोमान अली (Noman Ali) याने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चमकदार कामगिरी केलीकसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक (Hattrick) घेणारा तो पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज ठरला आहे.
कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात पहिल्याच दिवशी ३८ वर्षीय डावखुरा फिरकीपटू नोमान अलीने वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडले. १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ग्रीव्हजला स्लिपमध्ये बाबर आझमकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर इमलाच याला पायचीत (एलबीडब्ल्यू) केले. तर पुन्हा एकदा सिंक्लेअरला बाबरकरवी झेलबाद करत हॅटट्रिक आपल्या नावावर केली. मालिकेतील दुसर्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६३ धावांमध्ये आटोपला आहे.
फिरकीपटू नोमान अली कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा पाचवा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा वसीम अक्रम हा पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला होता. त्याने दोनवेळा हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. यानंतर जून २००० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अष्टपैलू अब्दुल रझाकने हॅटट्रिक घेतली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद सामी याने मार्च २००२ मध्ये लाहोर येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेणारा तिसरा पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला होता. तर वेगवान गोलंदाज नसीम शाह याने फेब्रुवारी २०२० मध्ये रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.आजवर एकाही पाकिस्तानी फिरकीपटूला हॅटट्रिक घेण्याची कामगिरी करता आली नव्हती. आज नोमान अलीने ही विक्रमी कामगिरी आपल्या नावावर केली.