पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा (IPL 2024) 17 वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून त्यात कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि बेंगळुरू या संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सची कामगिरी या हंगामात खूपच निराशाजनक ठरली. गुणतालिकेत दहाव्या स्थानावर घसरलेल्या मुंबई संघाने प्रत्येक सामन्यात खराब प्रदर्शन केले. आयपीएल 2024 मध्ये मुंबईने 10 पैकी फक्त चार सामने जिंकले आहेत. संघाचा नेट रन रेट (- 0.318) या मोसमात सर्वात वाईट होता. संघाचे मालक नीता अंबानी यांनी संघाच्या कामगिरीबद्दल पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित करताना दिसत आहे.
नीता अंबानी म्हणाल्या की, संघातील प्रत्येक खेळाडूंनी त्यांच्या चुकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या सर्वांसाठी हा एक निराशाजनक हंगाम ठरला आहे. आम्हाला पाहिजे तशा गोष्टी घडून आल्या नाहीत. परंतु, मी अजूनही मुंबई इंडियन्सची खूप मोठी चाहती आहे. मला वाटते की, मुंबई इंडियन्सची जर्सी घालणे खूप मोठा सन्मान आहे. मुंबई इंडियन्सशी निगडीत असणे हा एक सन्मान आणि विशेषाधिकार आहे. आम्ही परत जाऊन आमच्या चुकांची समीक्षा करून आत्मचिंतन करू.
दरम्यान, नीता अंबानी यांनी टी-20 विश्वचषक 2024 साठी निवडलेल्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदनही केले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना आगामी विश्वचषकासाठी त्यांनी खास संदेश दिला. त्या पुढे म्हणाल्या की, रोहित, हार्दिक, सूर्या आणि बुमराह यांना विश्वचषकासाठी शुभेच्छा. आम्हाला आशा आहे की तुम्ही 2024 च्या T20 विश्वचषकात चांगली कामगिरी कराल.
भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकाची सुरुवात करेल. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर 9 जून रोजी टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध मोठा सामना खेळणार आहे. यानंतर भारत १२ जूनला अमेरिका आणि १५ जूनला कॅनडाविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा