

कोलकाता; वृत्तसंस्था : येथील प्रतिष्ठित ‘टाटा स्टील रॅपिड’ बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरिनने आपल्या प्रगल्भ खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात महान खेळाडू विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखत निहालने नव्या वर्षाची शानदार सुरुवात केली. विशेष म्हणजे, विश्वविजेत्या डी. गुकेशने स्पर्धेतून माघार घेतल्याने निहालला ‘वाईल्ड कार्ड’द्वारे ऐनवेळी पाचारण करण्यात आले होते. या संधीचे त्याने ऐतिहासिक जेतेपदात रूपांतर केले.
पहिल्या दिवशी अवघ्या 1.5 गुणांसह संथ सुरुवात करणार्या निहालने दुसर्या सत्रापासून आक्रमक पवित्रा घेतला. पुढील सहा फेर्यांमध्ये त्याने प्रज्ञानंद आणि विश्वनाथन आनंद यांसारख्या दिग्गजांना बरोबरीत रोखत, तर इतर चार फेर्यांत विजय मिळवत 5 गुणांची कमाई केली. अलीकडेच 2,700 रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडणार्या निहालने या विजयाद्वारे गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांच्यासारख्या समकालीन जागतिक कीर्तीच्या खेळाडूंच्या पंक्तीत स्वतःचे स्थान अधोरेखित केले आहे.
हे जेतेपद निहालसाठी भावनिकद़ृष्ट्या महत्त्वाचे ठरले. ज्या आजोबांनी त्याला बुद्धिबळाचे बाळकडू दिले, त्यांचे गुरुवारी रात्री, म्हणजेच विजयाच्या पूर्वसंध्येला निधन झाले. आपल्या भावना शब्दबद्ध करताना तो म्हणाला, ‘आजोबांनीच मला या खेळाची ओळख करून दिली आणि माझ्या बुद्धिबळ प्रवासाचा पाया रचला. त्यामुळे हे यश पूर्णतः त्यांना समर्पित करत आहे.’