पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar) यांच्याशी असणारा करार सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने परस्पर संमतीने रद्द केल्याची घाेषणा केली आहे. आता नेमारने ब्राझीलमधील सँटोस क्लबमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. सुमारे १२ वर्षानंतर तो पुन्हा एकदा या क्लबमध्ये सामील झाला आहे. सँटोस क्लबचे अध्यक्ष मार्सेलो टेक्सेरा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
अल-हिलालने अलीकडेच स्पष्ट केले होते की, क्लबने नेमारशी परस्पर संमतीने करार रद्द केला आहे. त्याने अल हिलालसाठी केवळ सात सामने खेळले. या सात सामन्यांमध्ये फक्त एक गोल केला आणि दोन गोल करण्यास मदत केली. यापूर्वी नेमार हा बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनकडूनही खेळला होता. गेल्या हंगामात सौदी लीग जिंकणाऱ्या संघात त्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र दुखापतीमुळे ऑक्टोबर २०२३ पर्यंत तो संघाबाहेरच राहिला होता. फिफा क्लब विश्वचषकात अल-हिलालने भाग घेतल्यानंतर नेमारचा करार संपणार होता. क्लब वर्ल्ड कप १५ जून ते १३ जुलै दरम्यान अमेरिकेत खेळला जाणार आहे.
नेमार ऑगस्ट २०२३ मध्ये पॅरिस सेंट-जर्मेन क्लबमधून बाहेर पडला. यानंतर त्याने अल-हिलाला क्लबशी ९ दशलक्ष युरो (सुमारे ८१२ कोटी रुपये)चा करार केला. फुटबॉलमधील खेळाडूंच्या महत्त्वाच्या करारांपैकी हा एक करार होता; पण अल-हिलालमध्ये सामील झाल्यानंतर काही महिन्यांनी ब्राझीलकडून खेळत असताना नेयमारला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात गंभीर दुखापत झाली हाेती.
नेमारने सॅंटोस क्लबकडून खेळताना सहा जेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये २०११ मधील कोपा लिबर्टाडोरेस ट्रॉफीचा समावेश आहे. मार्सेलोने त्याच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर म्हटले आहे की, "नेमारची परतण्याची वेळ आली आहे. त्याला त्याच्या लोकांसाठी परत येण्याची वेळ आली आहे. घरी या आणि आपल्या हृदयाच्या जवळ असलेल्या क्लबमध्ये परत या. स्वागत आहे नेयमार. सॅंटोस तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहे."