पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा केन विल्यमसनने (kane williamson) सोमवारी कराची येथे झालेल्या तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाबाद शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तसेच विल्यमसनने विराट कोहलीचा एक उल्लेखनीय विक्रम मोडला आणि तो ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने विराट कोहलीचा विक्रम मोडित काढला आहे. वनडेमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. केन विल्यमसनने वनडेत १५९ डावांमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने हा टप्पा १६१ डावांमध्ये गाठला होता. सर्वात कमी डावात सात हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला याच्या नावावर असून, त्याने सात हजार धावा १५० डावांमध्ये पूर्ण केल्या होत्या.
कराची येथे झालेल्या तिरंगी मालिकेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विल्यमसनने ७२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि दोन षटकार मारून शतक पूर्ण केले. या दमदार शतकी खेळीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके पूर्ण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचीही त्याने बरोबरी देखील केली. डिव्हिलियर्ससारखेच विल्यमसनने ४७ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सर्वाधिक शतके झळविणार्या फलंदाजांच्या यादीत हे दोघेही आता संयुक्तपणे १४ व्या स्थानावर आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १०० शतकांसह यादीत अव्वल स्थानावर आहे.
हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका, १५०)
केन विल्यमसन ( न्यूझीलंड,१५९)
विराट कोहली (भारत, १६१)
एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका, १६६)
सौरव गांगुली (भारत, १७४)
रोहित शर्मा ( भारत,१८१)
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज, १८३)
मार्टिन गुप्टिल ( न्यूझीलंड, १८६)
डेसमंड हेन्स ( वेस्ट इंडिज,१८७)
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका, १८८)