पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट संघाची न्यूझीलंडविरुद्धची हाराकिरी आजही (दि.२६) कायम राहिली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवत टी-20 मालिका ४-१अशी जिंकली. (New Zealand vs Pakistan) सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या जेम्स नीशमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर मालिकेत तडाखेबाज फलंदाजी करणाऱ्या टिम सेफर्टला (२४९ धावा) मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी हा निर्णय अयोग्य ठरवला. सलामीवीर हसन नवाज याला पुन्हा एकदा आपले खातेही उघडता आले नाही. तो शून्यवर दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्याचा साथीदार मोहम्मद हरिसही १७ चेंडूत ११ धावावर तंबूत परतला. ओमेर युसूफ ७, उस्मान खान ७ तर अब्दुल समदने ४ धावांचे योगदान दिले. ५२ धावांवर ५ विकेट गमावल्यानंतर, डळमळीत पाकिस्तानी डाव कर्णधार सलमान आगा आणि शादाब खान यांच्या जोडीने सांभाळला. दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली आणि धावसंख्या १०० च्या पुढे नेली. शादाबने २० चेंडूत पाच चौकारांसह २८ धावांची खेळी केली. तर सलमानने अर्धशतक ठोकले आणि ३९ चेंडूत ५१ धावा केल्या. या दोघांमुळेच पाकिस्तान संघाने २० षटकांमध्ये नऊ विकेट गमावून १२८ धावा केल्या.न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर जेकब डफीनेही दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली. टिम सेफर्टने फिन ऍलनसह पॉवर प्लेमध्येच तब्बल ९२ धावा केल्या. ही भागीदारी ९३ धावांवर संपली. १२ चेंडूत २७ धावा करून ॲलन बाद झाला. यानंतर मार्क चॅपमनही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ३ धावा केल्या. सेफर्टने केवळ ३८ चेंडूत सहा चौकार आणि दहा षटकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावा काढत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. डॅरिल मिशेल २ धावा काढून नाबाद राहिला. यूझीलंडने अवघ्या १० षटकांमध्ये दोन गडी गमावत १२९ धावांचे लक्ष्य पूर्ण करत मालिका ४-१ अशी जिंकली.