पुढारी ऑनलाईन डेस्क : 2024 च्या महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. हा सामना दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यामध्ये आमेलिया केर ही तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे या सामन्याची शिल्पकार ठरली आहे. (women T20 world cup)
विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने 32 धावांची, अमेलिया केरने 43 धावांची आणि ब्रूक हॅलिडेने 38 धावांची दमदार खेळी केली आहे. तिघींच्याही कामगिरीमुळे संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. द. आफ्रिकेकडून मलाबाने दोन तर खाका, ट्रायन आणि नदिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (women T20 world cup )
तर 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पावरप्लेमध्ये 42 धावा केल्या. त्यानंतर त्यांच्या लागोपाठ विकेट्स पडत राहिल्या. दक्षिण आफ्रिकेडून खेळताना कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने 27 चेंडूत 33 धावा केल्या. या पाठोपाठ ताजमिन ब्रिट्स हीने 17 धावा केल्या. या दोघींमध्ये 41 चेंडूत 51 धावांची भागिदारी झाली होती. गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडच्या महिलांनी कहर केला. यामध्ये आमेलिया केर हीने चार षटकांत 24 धावा घेत तीन बळी घेतले. तर तिला साथ देत रोझमेरी मेयर हीने चार षटकांत 25 धावा देत 3 बळी घेतले. या दोघींनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या विस्फोटक खेळीवर लगाम लावत संघाला विश्वचषकापर्यत नेले. या व्यतिरिक्त ईडन कार्सन, फ्रॅन जोनास आणि ब्रुक हॅलिडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (women T20 world cup)