

ख्राईस्टचर्च; वृत्तसंस्था : डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी शेवटच्या क्षणापर्यंत दाखवलेल्या संयमाच्या जोरावर न्यूझीलंडने तिरंगी टी-20 मालिकेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने संपूर्ण मालिकेत अपराजित राहत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनवे (47) आणि रचिन रवींद्र (47) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या. 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लुआन-ड्रे प्रिटोरियसने (51) शानदार अर्धशतक झळकावत आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत महत्त्वाचे बळी मिळवून सामन्यावर पकड निर्माण केली.
शेवटच्या षटकांमध्ये सामना अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचला होता. डेवाल्ड ब्रेविसने स्फोटक फलंदाजी करत सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकवला होता. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना, मायकेल ब्रेसवेल आणि डॅरिल मिशेल यांनी सीमारेषेवर घेतलेल्या दोन अविश्वसनीय झेलांमुळे सामना पूर्णपणे फिरला. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना मॅट हेन्रीने एकही धाव दिली नाही आणि न्यूझीलंडने थरारक विजय साकारला.