ओसाका, सेरेना तिसर्या फेरीत | पुढारी
मेलबर्न : वृत्तसंस्था
गतविजेत्या जपानच्या नाओमी ओसाका व अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला. तर, नोव्हाक जोकोव्हिच व रॉजर फेडरर यांनीही आरामात विजय मिळवून स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत बुधवारी गतविजेत्या नाओमी ओसाकाची दुसर्या फेरीत झेंग सेईसेईवर 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळविला. या विजयाबरोबच ओसाकाने तिसर्या फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिची गाठ 15 वर्षीय कोको गॉफ हिच्याविरुद्ध पडणार आहे. उल्लेखनीय म्हणजे कोकोने गेल्यावर्षी विम्बल्डमध्ये व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणले होते. तर, दुसर्या फेरीत कोकोने सोराना क्रिष्टी हिचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव केला.
महिला एकेरीच्या आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिसर्या फेरीत प्रवेश करताना झिडॅनसेकचा 6-2, 6-3 असा धुव्वा उडवत तिसर्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, 2019 ची उपविजेत्या पेत्रा क्विटोव्हानेही पाऊलो बाडोसा हिचा 7-5, 7-5 असा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला. तर, माजी अग्रमानांकित कॅरोलिन वोज्नीयाकीने युक्रेनच्या डायना यास्ट्रेम्स्का हिचा 7-5, 7-5 असा धुव्वा उडविला. तर, ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने पोलोना हर्कोगचा 6-1, 6-4, 6-2 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोव्हिचने वर्षातील पहिले ग्र्रँडस्लॅम पटकावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकताना जपानच्या वाईल्डकार्डधारी तत्सुमा इतो याचा 6-1, 6-4, 6-2 असा सहज फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश केला. तर, जेतेपदाचा आणखी एक प्रबळ दावेदार व तिसर्या मानांकित स्विर्त्झलंडच्या रॉजर फेडररने सर्बियाच्या फिलीप क्रॅजीनोव्हिक याचा 6-1, 6-4, 6-1 असा धुव्वा उडवून तिसर्या फेरीत मुसंडी मारली.