स्‍वप्‍नपूर्ती.! तब्‍बल २७ वर्षांनंतर मुंबईने जिंकला इराणी चषक

Irani Cup 2024-25 : अखेरच्‍या दिवशी तनुष कोटियनची शतकी खेळी
Irani Cup 2024-25
मुंबई संघाने इराणी चषकावर आज (दि. ५ ऑक्‍टोबर) तब्‍बल २७ वर्षानंतर आपलं नाव कोरलं. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील क्रिकेट स्‍पर्धांमधील सर्वात प्रभावी क्रिकेट संघ असणार्‍या मुंबई संघाने इराणी चषकावर ( Irani Cup 2024-25 p) आज (दि. ५ ऑक्‍टोबर) आपलं नाव कोरलं. यापूर्वी १९९७ मध्‍ये संघाने अशी कामगिरी केली होती.

इराणी चषकसाठीचा अंतिम सामना हा रणजी करंडक विजेता संघ विरुद्ध शेष भारत असा होतो. मुंबईने आपल्‍या पहिल्या डावात सर्फराझ खानच्या द्विशतकासह कर्णधार अजिंक्‍य रहाणेची ९७ धावांच्‍या लक्षवेधी खेळीने ५३७ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईश्वरनच्या १९१ तर ध्रुव जुरेलच्‍या ९३ धावांच्या खेळी केली. मात्र या दाेघांच्‍या विकेटनंतर शेष भारत संघाचा डाव गडगडला आणि ४१६ धावांवरच संपुष्‍टात आला हाेता. ( Irani Cup 2024-25)

अखेरच्‍या दिवशी कोटियनची शतकी खेळी

मुंबईला पहिल्‍या डावात १२१ धावांची आघाडी मिळाली हाेती. मात्र दुसर्‍या डावात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्‍वी शाॅ दमदार फलंदाजी करत असताना दुसर्‍या बाजूने फलंदाजांचे स्‍वस्‍तात तंबूत परतले. चाैथ्‍या दिवसाच्‍या शेवटच्‍या षटकात पृथ्‍वी शाॅही ७४ धावांवर बाद झाला. त्‍यामुळे दिवसअखेर मुंबईने ६ गडी गमावत १५४ धावा केल्‍या. संघाला एकूण २७४ धावांची आघाडी मिळाली हाेती.चाैथ्‍या दिवशी २० धावांवर नाबाद राहिलेल्‍या तनुष कोटियनने सामन्‍याच्‍या अखेरच्‍या पाचव्‍या दिवशी शतकी खेळी साकारली. अखेर हा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आले. ( Irani Cup 2024-25 )

पहिला डावातील आघाडी मुंबईसाठी ठरली निर्णायक

इराणी चषकासाठी फक्त एकच सामना खेळला जातो. त्‍यामुळे इराणी चषक क्रिकेट स्‍पर्धेतील नियम असा आहे की, हा सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजेता संघ ठरवला जातो. पहिल्या डावानंतर आघाडी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाते. यंदा इराणी चषक स्‍पर्धेत मुंबई संघाला पहिल्या डावात मिळालेली १२१ धावांची आघाडी निर्णायक ठरली. तसेच तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनी पाचव्या दिवशी मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. कोटियनने १५० चेंडूंत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ११४ धावा केल्या. अवस्थीने 93 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या.

सर्फराज खान ठरला सामनावीर

मुंबईचा स्‍टार फलंदाज सर्फराज खान सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. सर्फराजने 286 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी करत नाबाद 222 धावा केल्‍या. मात्र दुसर्‍या डावात तो केवळ १७ धावांपर्यंत मजल मारु शकला. शेष भारत संघाच्‍या सरांश जैनने सात विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या डावात सहा आणि पहिल्या डावात एक बळी घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news