

श्रीनगर; वृत्तसंस्था : डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने यजमान जम्मू-काश्मीर संघाचा रणजी करंडकाच्या ‘ड’ गटातील रोमांचक सलामी लढतीत 35 धावांनी पराभव केला. मुलानीने या सामन्यात 7 बळी मिळवले.
शनिवारी, सामन्याच्या अंतिम दिवशी विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी जम्मू-काश्मीरला 222 धावांची आवश्यकता होती. मात्र, मुंबईच्या पहिल्या डावात 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणार्या मुलानीच्या फिरकीपुढे यजमान संघाचा डाव 64.4 षटकांत 207 धावांवर संपुष्टात आला. फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत मुलानीने 46 धावांत 7 बळी घेण्याची कामगिरी बजावली.
कर्णधार आयुष बदोनीने 6/73 अशी भेदक गोलंदाजी केली, तर सहकारी फिरकी गोलंदाज अर्पित राणाने (3/23) महत्त्वपूर्ण बळी घेत दिल्लीला यजमान हैदराबादविरुद्ध तीन गुणांची कमाई करून दिली. 7 बाद 400 धावसंख्येवरून पुढे खेळताना हैदराबादचा डाव अवघ्या अर्ध्या तासात 411 धावांवर आटोपला. बदोनी आणि राणा यांनी हैदराबादचे शेपूट झटपट गुंडाळले.
कोईम्बतूर : पदार्पणाचा सामना खेळणार्या युवा ऑफ-स्पिनर रिशव राजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर झारखंडने माजी विजेत्या तामिळनाडूचा एक डाव आणि 114 धावांनी धुव्वा उडवला. रणजी करंडक ‘अ’ गटातील चौथ्या दिवशी शनिवारी झारखंडने हा विजय नोंदवला.
राजकोट : कर्नाटकने डाव लवकर घोषित करण्यास दाखवलेल्या अनिश्चिततेमुळे त्यांना सौराष्ट्रला दुसर्या डावात बाद करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि येथील रणजी करंडक ‘ब’ गटातील सामना चौथ्या आणि अंतिम दिवशी अनिर्णीत राहिला. सामना संपला तेव्हा असमान खेळपट्टीवर सौराष्ट्रची दुसर्या डावात 5 बाद 128 अशी धावसंख्या होती.
कोलकाता : मोहम्मद शमीने केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर बंगालने रणजी करंडक ‘क’ गटातील सामन्यात उत्तराखंडवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शमीने चार बळी घेत बंगालच्या विजयाचा मार्ग सुकर केला.