

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सोमवारी पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सला वानखेडे स्टेडियमवर खेळताना 8 विकेटस्ने पराभूत केले. यंदाच्या हंगामातील हा मुंबईचा घरच्या मैदानावरील पहिला सामना होता. त्यांना याआधी बाहेरच्या मैदानात झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे मुंबईने गुणांचे खाते उघडले आहे. या सामन्यात कोलकाताने मुंबईसमोर 117 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. हे आव्हान मुंबईने 12.5 षटकांत 2 विकेटस् गमावत 43 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. मुंबईच्या विजयात पदार्पणवीर अश्वनीकुमार याने 4 विकेटस् घेत मोलाचा वाटा उचलला.
केकेआरच्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सुरुवात केली होती. रिकल्टन आक्रमक खेळत होता, त्याला रोहितची साथ मिळत होती. पण 6 व्या षटकात रोहितला हर्षित राणाच्या हातून आंद्रे रसेलने झेलबाद केले. रोहितने 12 चेंडूंत एका षटकारासह 13 धावा केल्या, पण नंतर रिकल्टनने विल जॅक्सला साथीला घेतले. त्यांच्यातही चांगली भागीदारी झाली होती. यादरम्यान, रिकल्टनने त्याचे अर्धशतकही केले. मात्र विजयासाठी 26 धावांची गरज असताना जॅक्स 16 धावांवर बाद झाला. सेलच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने त्याचा अफलातून झेल घेतला, पण नंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने फार वेळ न लावता फटकेबाजी करत संघाचा विजय 13 व्या षटकातच निश्चित केला. रायन रिकल्टनने 31 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावांनी नाबाद खेळी केली. सूर्यकुमार 9 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 27 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरुवात केली, पण पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने नरेनला शून्यावर त्रिफळाचीत केले, तर दुसर्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉकला 1 धावेवर दीपक चहरने अश्वनीकुमारच्या हातून झेलबाद केले. नंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी डाव पुढे नेत होते, पण पदार्पणवीर अश्वनीकुमारने पहिल्याच चेंडूवर रहाणेला बाद करण्याचा पराक्रम केला. तिलक वर्माने रहाणेचा एका हाताने अफलातून झेल घेतला. त्यामुळे रहाणे 11 धावांवर माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ वेंकटेश अय्यर देखील 3 धावांवर दीपक चहरविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. 7 व्या षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रघुवंशीला हार्दिक पंड्याने नमन धीरच्या हातून झेलबाद केले. त्याने 16 चेंडूंत 26 धावा केल्या. तरी नंतर रिंकू सिंग आणि मनीष पांडे यांनी डाव पुढे नेला, पण तेदेखील मोठी खेळी करू शकले नाहीत. 11 व्या षटकात या दोघांनाही अश्वनीकुमारनेच माघारी धाडले आणि कोलकाताला मोठे धक्के दिले. रिंकूचा झेल 17 धावांवर नमन धीरने घेतला, तर मनीषला अश्वनीकुमारने त्रिफळाचीत केले.
आंद्रे रसेलही फार काही करू शकला नाही. त्यालाही 13 व्या षटकात अश्वनीनेच 5 धावांवर त्रिफळाचीत केले. हर्षित राणाही 4 धावा करून बाद झाला. नंतर रमणदीप सिंगने काही मोठे शॉटस् खेळले, पण त्यालाही मिचेल सँटेनरने हार्दिक पंड्याच्या हातून 17 व्या षटकात झेलबाद करत कोलकाताचा डाव संपवला. रमणदीपने 12 चेंडूंत 22 धावा केल्या. स्पेन्सर जॉन्सन 1 धावेवर नाबाद राहिला. कोलकाताचा संघ 16.2 षटकांत 116 धावांवर सर्वबाद झाला. मुंबईकडून अश्वनी कुमारने 3 षटकांत 24 धावा देत 4 विकेटस् घेतल्या. दीपक चहरने 2 विकेटस् घेतल्या. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, विग्नेश पुथूर आणि मिचेल सँटेनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाता नाईट रायडर्स : 16.2 षटकांत सर्वबाद 116 धावा. (अंगक्रिश रघुवंशी 26, रमणदीप सिंग 22. अश्वनीकुमार 4/24.)
मुंबई इंडियन्स : 12.5 षटकांत 2 बाद 121 धावा. (रेयान रिकल्टन 62, सूर्यकुमार यादव 27. आंद्रे रसेल 2/35.)