

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सची मोहीम २३ मार्चपासून सुरू होईल. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. पण हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या सामन्यातून बाहेर पडेल. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पण जेव्हा तो स्वतः नवीन हंगामातील पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल, तेव्हा मोठा प्रश्न असा आहे की त्याची जागा कोण घेईल? त्याच्या जागी संघाची जबाबदारी कोण घेणार? हार्दिक पांड्याने स्वतः पत्रकार परिषदेत येऊन या मोठ्या प्रश्नाचे उत्तर दिले. आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडूचे नाव त्याने उघड केले आहे.
गेल्या हंगामात कर्णधार असताना तीनदा तीच चूक केल्याबद्दल हार्दिक पांड्याला शिक्षा झाली आहे. आयपीएल २०२४ मध्ये, तो तीनदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, त्यानंतर आयपीएलच्या नियमांनुसार त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने खेळलेल्या शेवटच्या सामन्यात तो तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा दोषी आढळला असल्याने, यावेळी त्याच्यावर बंदी घालण्यात येणार आहे. आणि, यामुळेच तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल.
हार्दिक पंड्याने महेला जयवर्धनेसोबत मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नवीन कर्णधाराबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की जर मी नसेन तर पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव संघाची सूत्रे हाती घेऊ शकतो. पत्रकार परिषदेत हार्दिकला कर्णधारपदाशी संबंधित आव्हानांबद्दलही बोलण्यात आले. त्याला विचारण्यात आले की, तू यापूर्वी अनेक संघांचे नेतृत्व केले आहेस, पण मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे त्यांच्या तुलनेत मोठे आव्हान आहे. यावर हार्दिक म्हणाला की, असं काही नाहीये. हो, पण मुंबईला एक वारसा आहे, जो टिकवणे हे एक मोठे आव्हान आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याने हे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकले आहे. पण हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हे अजून झालेले नाही. हार्दिकच्या नावावर कर्णधार म्हणून एक आयपीएल जेतेपद निश्चितच आहे, पण त्याने ते गुजरात टायटन्सकडून जिंकले.