GT vs MI | गुजरातचा घात; मुंबई आत

‘टायटन्स’ला हरवून ‘एमआय’ क्वालिफायर-2 मध्ये दाखल
 Mumbai Indians beats Gujarat Titans by 20 runs
रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी मुंबई इंडियन्सला धडाकेबाज सुरूवात करून दिली.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुल्लनपूर; वृत्तसंस्था : संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या गुजरात टायटन्सचा ऐन मोक्याच्या क्षणी घात झाला. एलिमिनेटर लढतीत मुंबईने त्यांना 20 धावांनी पराभूत करून ‘क्वालिफायर-2’ मध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने (GT vs MI) त्यांना चॅम्पियन संघ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवले. ‘आयपीएल 2025’मधील पहिल्या सहापैकी पाच सामने गमावूनही मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. त्यानंतर त्यांनी एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सला बाहेर काढून फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आता त्यांची लढत पंजाबविरुद्ध रविवारी (1 जून) होणार आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या 81 धावांच्या जोरावर 5 बाद 228 धावा केल्या. हे आव्हान पेलताना गुजरातचा संघ 6 बाद 208 धावाच करू शकला.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला शुभमन गिल 1 धावांवर ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर साई सुदर्शनने गुजरातसाठी खिंड लढवली. सुदर्शन जोखीम टाळून चेंडूला योग्य दिशा देण्याचे काम करत होता. त्याने अर्धशतकीय खेळी केली. त्याला पदार्पणवीर कुसल मेंडिसने चांगली साथ दिली होती. या दोघांनी 64 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात मिचेल सँटेनरच्या चेंडूवर कुसल विचित्र पद्धतीने बाद झाला. तो क्रिजच्या एवढा आत गेला की, त्याचा पाय स्टम्पवर आदळला आणि हिटविकेट होऊन तो 20 धावांवर परतला. गुजरातला 67 धावांवर दुसरा धक्का बसला.

यानंतर साई सुदर्शनला वॉशिंग्टनने सुंदर साथ दिली. साई सुदर्शन एका बाजूने मुंबईच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक गाठले. सुंदरही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना जसप्रीत बुमराहच्या एका अशक्यप्राय यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडाला. सुंदरने 48 धावा केल्या. जोपर्यंत सुदर्शन मैदानावर आहे, तोपर्यंत मुंबईला विजयाची खात्री नव्हती. शेवटी त्याचा अडथळा ग्लेसनने दूर केला. ग्लेसनचा चेंडू फाईनलेगला टोलावण्याच्या प्रयत्नात त्याच्या दांड्या उडाल्या. साईने 49 चेंडूंत 80 धावा केल्या. यानंतर मुंबईने सामन्यावर पकड बनवली. (GT vs MI)

गुजरातला शेवटच्या 18 चेंडूंत 45 धावांची गरज होती. बुमराहने आपल्या शेवटच्या षटकांत 9 धावा दिल्या. त्यामुळे 12 चेंडूंत 36 धावा असे समीकरण आले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रदरफोर्डने (24) तिलककडे झेल दिला. यानंतर पुढील चार चेंडू बोल्टने चांगले टाकले. परंतु, शेवटच्या चेंडूवर शाहरुख खानने षटकार ठोकून शेवटच्या षटकात 24 धावांचे समीकरण आणले. रिचर्ड ग्लेसनने तीन चेंडूंत 3 धावा दिल्या. परंतु, त्यानंतर त्याने पाय दुखावल्यामुळे मैदान सोडले. उरलेले तीन चेंडू टाकण्याची जबाबदारी अश्वनीकुमार याच्यावर आली. त्याने चौथ्या चेंडूवर शाहरुखला (13) बाद केले. उरलेले दोन चेंडू निर्धाव टाकून मुंबईने हा सामना 20 धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितला पहिल्या तीन षटकांत दोन जीवदान देऊन गुजरातने खूप मोठी चूक केली. तो काहीकाळ शांत राहिला. परंतु, जॉनी बेअरस्टोने वादळी खेळी केली. त्याने 22 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 47 धावा केल्या. साई किशोरच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो बाद झाला. साई सुदर्शनने नसलेला कॅच बनवला अन् गेराल्ड कोएत्झीने यावेळी कोणतीही चूक न करता झेल टिपला. बेअरस्टोने मुंबईला चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला. रोहितसह त्याने 84 धावा जोडल्या. (GT vs MI)

रोहित व सूर्यकुमार यादव या जोडीनेही 59 धावांची भागीदारी केली. सूर्यालाही एक जीवदान मिळाले होते. परंतु, तो 33 धावांवर बाद झाला. रोहितने मात्र हात मोकळे करताना 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्मा शतक पूर्ण करेल, असे वाटले होते. परंतु, प्रसिद्ध कृष्णाने त्याची विकेट घेतली. रोहित 50 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 81 धावांवर बाद झाला. तिलक वर्मानेही 11 चेंडूंत 25 धावा केल्या. नमन धीर 9 धावांवर बाद झाला. परंतु, हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात 3 खणखणीत षटकार खेचून मुंबईला 5 बाद 228 धावांपर्यंत पोहोचवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news