Mumbai vs Chhattisgarh | मुंबईचा छत्तीसगडवर 9 गड्यांनी दणदणीत विजय

कर्णधार शार्दूलची भेदक गोलंदाजी; मुंबई ‘क’ गटात अव्वल
Mumbai vs Chhattisgarh
Mumbai vs Chhattisgarh | मुंबईचा छत्तीसगडवर 9 गड्यांनी दणदणीत विजयPudhari file Photo
Published on
Updated on

जयपूर : कर्णधार शार्दूल ठाकूरने नाणेफेकीपासून ते गोलंदाजीपर्यंत सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत सोमवारी विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईला सलग तिसरा विजय मिळवून दिला. शार्दूलच्या चार बळींच्या झंझावातामुळे मुंबईने छत्तीसगडचा 9 गड्यांनी पराभव करत ‘क’ गटातील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. शार्दूलने सुरुवातीच्या अर्ध्या तासात फलंदाजी खिळखिळी केली, तर उर्वरित जबाबदारी डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने फत्ते केली. मुलाणीने (5/31) अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत छत्तीसगडच्या खालच्या फळीचा धुव्वा उडवला.

येथील जयपुरिया विद्यालय मैदानावर शार्दूलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या पाच षटकांतच छत्तीसगडची अवस्था 4 बाद 10 अशी केली. अंतिमत: छत्तीसगडचा संघ 38.1 षटकांत 142 धावांवर गारद झाला. छत्तीसगडचे शेवटचे 6 बळी अवघ्या 27 धावांत पडले.

विजयासाठी मिळालेले 142 धावांचे माफक लक्ष्य मुंबईने अवघ्या 24 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. युवा फलंदाज अंगक्रीश रघुवंशीने (66 चेंडूंत नाबाद 68) आणि अनुभवी सिद्धेश लाडने (42 चेंडूंत नाबाद 48) दुसर्‍या गड्यासाठी 102 धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने 12 गुणांसह गटात अव्वल स्थान गाठले आहे. कर्णधार शार्दूलने 5 षटकांत 13 धावा देत 4 बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news