

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) ‘थाला’ महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का, या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एका कार्यक्रमादरम्यान धोनीने आपल्या भविष्याबद्दल एक अत्यंत सूचक विधान केले असून, मी पिवळ्या जर्सीमध्येच असेन, पण खेळत असेन की नाही, ही वेगळी गोष्ट आहे, असे म्हणत त्याने चेन्नईसोबतच्या आपल्या अतूट नात्यावर भर दिला.
तो म्हणाला, मी आणि सीएसके नेहमीच एकत्र आहोत. पुढील 15-20 वर्षेही हे नाते असेच राहील, पण याचा अर्थ मी पुढील 15-20 वर्षे खेळणार आहे, असा घेऊ नका, असेही त्याने स्मित हास्यासह स्पष्ट केले. चेन्नई आणि संघासोबतच्या आपल्या नात्यावर बोलताना तो पुढे म्हणाला, या नात्यामुळे एक व्यक्ती आणि एक खेळाडू म्हणून माझ्यात खूप सुधारणा झाली. चेन्नईसोबतचे हे नाते माझ्यासाठी खूप खास आहे.
धोनी 2008 पासून आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विक्रमी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, गेल्या काही हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावर बोलताना धोनी म्हणाला,‘गेले काही हंगाम आमच्यासाठी चांगले नव्हते, पण महत्त्वाचे आहे ते चुकांमधून शिकणे. काय चुकले याचे विश्लेषण करत आम्ही ताज्या दमाने रणनीतीत बदल करू.’