

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (दि.28) पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने 26 धावांनी विजय मिळवला. यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नाणेफेकीसाठी बाहेर पडताच राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियम मोठ्या जल्लोषाने दणाणून निघाला. पण प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयापेक्षाही चाहते एका मोठ्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची."अर्शदीप विश्रांती घेत आहे, शमी येतोय," नाणेफेक जिंकल्यानंतर सूर्यकुमारने घोषित केले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
14 महिन्यांनंतर शमीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. परंतु या पुनरागमनाच्या सामन्यात आपली छाप सोडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यानंतर बाहेर असलेला शमी मध्यंतरी स्थानिक क्रिकेट खेळला होता, परंतु त्यानंतर हा त्याचा भारतासाठी पहिलाच सामना होता. आपल्या उत्कृष्ठ अन् अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला शमी त्याच्या पुनरागमन सामन्यात जुन्या लयीमध्ये दिसला नाही. या सामन्यात त्याने तीन षटके टाकली. त्यामध्ये 8.30 च्या सरासरीने 25 धावा दिल्या आणि त्याला विकेट मिळाली नाही. सामन्यानंतर कर्णधार सुर्या म्हणाला "मला खात्री आहे की शमी पुढे चांगली कामगिरी करेल." मात्र शमीकडून अपेक्षा लावून बसलेल्या चाहत्यांच्या पदरी या सामन्यात निराशाच पडली.
सुरुवातीचे दोन सामने बाहेर बसल्यानंतर या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारतीय संघात स्थान मिळवले. पण तो जुन्या लयीत दिसला नाही. शमीऐवजी उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली. त्याने गेल्या 2 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता. पण तिसऱ्या सामन्यात शमीला त्याची छाप सोडता आली नाही, जो मोठा पराभव ठरला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर शमी भारतीय संघात परतला. पण त्याने या सामन्यात 3 षटके टाकली आणि 25 धावा दिल्या. शमीला एकही विकेट मिळाली नाही. त्याचा इकॉनॉमी रेटही ८.३३ होता.