मुंबई ; वृत्तसंस्था : मुंबईने ठेवलेले 152 धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स (MIvsRCB) बेंगलोरने नऊ चेंडू बाकी असतानाच पार केले आणि 7 गडी राखून शानदार विजय नोंदवला. त्याचबरोबर आरसीबीने यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामन्यांतून तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली. मुंबईची पाटी सलग चौथ्या पराभवामुळे कोरीच उरली आहे. सलामीवीर अनुज रावत याने दणकेबाज खेळी करून आरसीबीचा विजय सुकर केला. 47 चेंडूंत त्याने 66 धावा चोपताना दोन चौकार आणि अर्धा डझन षटकार खेचले.
कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी आरसीबीच्या डावाची सावध सुरुवात केली. या जोडीने 50 धावांची सलामी दिली. डू प्लेसिस हा 24 चेंडूंत 16 धावा करून बाद झाला. नंतर अनुज रावत आणि विराट कोहली या जोडीने झकास टोलेबाजी केली. कोहलीने 36 चेंडूंत 48 धावा करताना 5 चौकार हाणले. डेवाल्ड ब्रेव्हिस याने कोहलीला पायचीत पकडले. मग दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि ब्रेव्हिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आरसीबीने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने सुनामीसारखी खेळी करून आपल्या संघाला सुस्थितीत आणले. यादव याने 37 चेंडूंत 68 धावा झोडल्या. 5 चौकार व अर्धा डझन षटकार खेचून त्याने सामन्यात रंगत आणली. त्यामुळेच मुंबई संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 151 धावा केल्या. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाला सावध सुरुवात करताना 50 धावांची सलामी दिली. रोहित शर्माची फलंदाजी बहरणार असे वाटत असतानाच तो 26 धावांची खेळी करून तंबूत परतला. 15 चेंडूंचा सामना करताना त्याने 4 चौकार व 1 षटकार ठोकला.
ईशान किशननेही नेमक्या 26 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हिस याने 8 धावा केल्या, तर तिलक वर्मा आणि कायरान पोलार्ड यांना भोपळाही फोडता आला नाही. हे कमी म्हणून की काय राजदीप सिंग हाही अवघ्या 6 धावांवर बाद झाला. 14 षटकांचा खेळ संपला तेव्हा मुंबईची अवस्था 6 बाद 80 अशी दयनीय झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार तळपला. आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन तर आकाशदीप याने एक गडी तंबूत पाठवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे मुंबईला धावांसाठी संघर्ष करावा लागला.
संक्षिप्त धावफलक (MIvsRCB)
मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 6 बाद 151. (सूर्यकुमार यादव नाबाद 68, रोहित शर्मा 26. हर्षल पटेल 2/23)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ः 18.3 षटकांत 3 बाद 152. (अनुज रावत 66, विराट कोहली 48. जयदेव उनाडकट 1/30.)