

लॉस एंजेलिस; वृत्तसंस्था : मिकेल मेरिनो विश्वचषकाच्या इतिहासात बदली खेळाडू (सब्स्टिट्यूट) म्हणून येत दोन वेगवेगळ्या बाद फेरीच्या (नॉकआऊट) सामन्यांमध्ये विजयी गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला असून त्याने ८८ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर स्पेनने बेल्जियमचा २-१ असा निसटता पराभव केला आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोरदार धडक मारली. मेरिनो येथे शेवटच्या केवळ ९ मिनिटांसाठी मैदानात आला होता. त्यातही त्याने गोल करत अनोखा विश्वविक्रम केला.
यापूर्वी पोर्तुगालविरुद्धच्या लढतीतही मेरिनो केवळ ६ मिनिटांसाठी मैदानात आला असता त्यावेळीही त्याने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला होता. या लढतीत स्पेनतर्फे रुईजने ३० व्या मिनिटाला संघाचे गोल खाते उघडल्यानंतर बेल्जियमच्या केतलाएरेने अवघ्या ११ मिनिटांतच संघाला बरोबरी मिळवून दिली होती. त्यानंतर पूर्ण वेळेत जेमतेम २-३ मिनिटांचा खेळ बाकी असताना मेरिनोला गोल करण्याची नामी संधी सापडली आणि याचे सोने करत त्याने संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. या ऐतिहासिक विजयासह स्पेनने उपांत्य फेरीत धडक मारली असून, आता मंगळवारी टेक्सास येथे त्यांची गाठ बलाढ्य फ्रान्सशी पडणार आहे.
उत्तरार्धात बेल्जियमचा हुकमी गोलरक्षक थिबॉत कोर्टुआ दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी आलेल्या युवा सेना लॅमेन्सला स्पेनचे आक्रमण थोपवण्यात अपेक्षित यश आले नाही. ८८ व्या मिनिटाला स्पेनच्या पाऊ कुबार्सीने मारलेला फटका लॅमेन्सच्या हातातून निसटला. याच संधीचा फायदा घेत अवघ्या ११७ सेकंदांपूर्वी बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या मेरिनोने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि स्पेनला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
जानेवारी २०२६ मध्ये अर्सेनल क्लबकडून खेळताना मिकेल मेरिनोच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो विश्वचषक खेळू शकेल की नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दुखापत इतकी गंभीर होती की मेरिनोला सलग दोन महिने साधे चालणेही शक्य नव्हते. घराबाहेर पडण्यासाठी आणि हालचाली करण्यासाठी त्याला ‘मोबिलिटी स्कूटर’चा (इलेक्ट्रिक व्हीलचेअर) वापर करावा लागत होता. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ३० वर्षीय मेरिनोने संघात पुनरागमन तर केलेच. त्याही शिवाय, तो या विश्वचषकात स्पेनसाठी सर्वात मोठा ‘मॅच-विनर’देखील ठरला.
या विजयासह स्पेनने मार्च २०२३ पासून सलग ३६ सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे. हीच घोडदौड यापुढेही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फुएन्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनचा संघ सध्या अभेद्य फॉर्मात असून, आता मंगळवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत फ्रान्सविरुद्ध त्यांचा महामुकाबला रंगणार आहे. ही हाय व्होल्टेज लढत विशेष लक्षवेधी ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत.