अहमदाबाद : एखाद्या रोलर-कोस्टरप्रमाणे अगदी शेवटच्या षटकापर्यंत जणू इंच न इंच भूमी लढवल्या गेलेल्या ‘आयपीएल’च्या दुसर्या क्वालिफायर लढतीत पंजाब किंग्जने सर्वस्व पणाला लावले आणि मुंबईच्या हातातोंडातील विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला.
पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात मुंबईने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 203 धावांचा डोंगर जरूर रचला; पण पंजाबचे इरादे त्यापेक्षाही बुलंद होते आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी जणू मुंबईच्या पराभवाची दास्ताँ लिहिली! विजयासाठी 204 धावांचे तगडे आव्हान असताना प्रियांश आर्य 20, तर प्रभसिमरन 6 धावांवर स्वस्तात बाद झाले होते. मात्र, त्यानंतर जोश इंग्लिसने 21 चेंडूंत 38 धावा केल्या आणि त्यापाठोपाठ श्रेयस अय्यर व नेहल वधेरा यांची फ टकेबाजी निर्णायक ठरली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरने या लढतीत अवघ्या 41 चेंडूंत 87 धावांची तडाखेबंद फलंदाजी साकारत कर्णधाराने संघाची नौका विजयापार कशी न्यायची असते, याचा या लढतीत जणू धडाच घालून दिला. त्याने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत अवघ्या 41 चेंडूंत 87 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली, त्यावेळी मुंबईच्या अगदी कसलेल्या गोलंदाजांसमोरही त्याकडे काहीच प्रत्युत्तर नव्हते.
श्रेयस अय्यरने रिस टॉपलीला डावातील 13 व्या षटकात सलग 3 षटकारांसाठी अक्षरश: भिरकावून दिले आणि यानंतर मुंबईच्या गोटात खळबळ उडाली नसती तरच नवल होते. श्रेयसने दुसरा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर, तिसरा चेंडू ओव्हर लाँगऑन तर चौथा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राऊंड षटकारासाठी फटकावत टॉपलीला हतबल करून टाकले. या षटकात पंजाबने 19 धावा वसूल केल्या.
यंदाच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या ‘आरसीबी’ व पंजाब या दोन्ही संघांना आजवर एकाही ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेत यावेळी नवा विजेता मिळेल, हे सुस्पष्ट झाले आहे.
विजयासाठी 204 धावांचे तगडे आव्हान असताना पंजाबने 7.5 षटकांत 72 धावांत 3 बळी गमावले होते. मात्र, त्यानंतर श्रेयस अय्यर व नेहल वधेरा ही जोडी मुंबईच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडत राहिली आणि याच जोडीने पंजाबला विजयाच्या उंबरठ्यापर्यंतही आणले. या जोडीने मुंबईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाला अगदी ‘सळो की पळो’ करून सोडले आणि त्यानंतर पंजाबचा विजय ही जणू औपचारिकताच होती!
अवघ्या 29 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 48 धावांची धुलाई करणारा नेहल वधेरा अखेर अश्वनी कुमारच्या वाईड यॉर्करच्या जाळ्यात सापडला होता. वास्तविक, वधेरा जवळपास प्रत्येक चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, चेंडू टप्प्याबाहेर असल्याने त्याचा अंदाज सपशेल चुकला आणि कव्हरवर सँटेनरने अचूक झेल टिपत वधेराची खेळी संपुष्टात आणली. मात्र, नंतर श्रेयसच्या धमाक्याने मुंबईच्या अशा सर्वच प्रयत्नांवर पाणी फेरले गेले!
या स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर लढतीत आरसीबीविरुद्ध पंजाबचा संघ अवघ्या 101 धावांमध्ये खुर्दा झाला, त्यावेळी श्रेयस अय्यरच्या शॉट सिलेक्शनवर बरीच टीका झाली होती. त्यात दुसर्या क्वालिफ फायर लढतीत 204 धावांचे तगडे आव्हान असल्याने आणि सलामीवीर स्वस्तात परतल्याने श्रेयसवर पुन्हा भिस्त होती. यावेळी मात्र श्रेयसने अजिबात निराशा केली नाही आणि त्याने संघाची नौका विजयापार नेली! आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या फ्रँचायझींना फायनलमध्ये नेण्याचा पराक्रमही त्याने येथे गाजवला. पहिल्या क्वालिफायरमधील निराश श्रेयस आणि आता स्वत: धडाडीने लढत विजय अक्षरश: खेचून आणणारा श्रेयस, अशा दोन निरनिराळ्या व्यक्तिरेखा यावेळी प्रकर्षाने अधोरेखित झाल्या.