

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारी समितीची त्रैवार्षिक (२०२५- २८) निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होत असून या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ प्रशासक, खासदार शरद पवार आणि भाजप आमदार आशीष शेलार एकत्र आले आहेत.
शरद पवार आणि आशीष शेलार गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात पदाधिकाऱ्यांमध्ये बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड (उपाध्यक्ष), गौरव पय्याडे (सहसचिव) आणि अरमान मलिक (खजिनदार) यांचा समावेश आहे.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह विघ्नेश कदम, विकास रेपाळे, प्रमोद यादव, भूषण पाटील, संदीप विचारे, मंगेश साटम, सूरज समत आणि मौलिक मर्चंट यांना पुरस्कृत केले आहे. गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजदीप गुप्ता (अध्यक्ष) आणि किशोर जैन (सदस्य) यांना पाठिंबा दिला.
दरम्यान, कुलिंग पीरियडच्या नियमानुसार, अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केलेली याचिका शहर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार आणि आशीष शेलार गटाने चार पदाधिकाऱ्यांसाठी उमेदवार जाहीर केले तरी सचिवपदासाठी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. सचिव पदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर अशी लढत होत आहे. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार, अजिंक्य नाईक यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा अर्ज माघारी घेतला. मात्र, सेक्रेटरीपदासाठी त्यांनी दावेदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे पवार आणि शेलार गटाचा पाठिंबा कुणाला याचा सस्पेन्स कायम आहे.